Aishwarya Rai Sonu Sood Raksha Bandhan Story: भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सिनेविश्वामध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्यामध्ये रक्ताचं नातं नसलं तरी ते मनाच्या बंधनांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या रायनंसुद्धा बॉलीवूडमधील एका अभिनेत्याला भाऊ मानले असून, १८ वर्षांपासून ती त्याला राखी बांधत आहे.

ऐश्वर्या रायने बॉलीवूड व दाक्षिणात्य सिनेविश्व गाजवलेला अभिनेता सोनू सूदला भाऊ मानले आहे. त्यांच्यामध्ये बहीण-भावाचं नातं निर्माण झालं असून, दरवर्षी ऐश्वर्या सोनूला बहिणीच्या मायेनं राखी बांधत असते. एका सिनेमामध्ये त्यांनी भाऊ-बहिणीच्या भूमिका साकारल्या होत्या. तेव्हापासून दोघांनी हे नातं जपलं आहे. सेलिब्रिटी भाऊ-बहिणींमध्ये ऐश्वर्या राय व सोनू सूद यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

ऐश्वर्या रायने सोनू सूदला सेटवर बांधलेली राखी

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ या चित्रपटात ऐश्वर्या रायनं जोधाची भूमिका साकारली होती; तर सोनू सूद तिचा भाऊ सुजामलच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांमध्ये बहीण-भावासारखं बॉण्डिंग तयार झालं. शूटिंगच्या काळात ऐश्वर्यानं पहिल्यांदा सोनू सूदला राखी बांधली होती. त्यानंतर त्यांच्यातील बहीण-भावाचं नातं आणखी घट्ट होत गेलं. आजही रक्षाबंधनाच्या दिवशी ऐश्वर्या सोनूला राखी बांधतात, असं सांगितलं जातं.

सोनू सूदनं एका मुलाखतीत ऐश्वर्याबरोबरच्या या खास नात्याचा किस्साही सांगितला होता. तो म्हणाला, “‘जोधा अकबर’च्या सेटवर सुरुवातीला ऐश्वर्या खूप शांत स्वभावाची होती. मात्र, एक दिवस शूटिंगदरम्यान आम्ही दोघांनी एकत्र सीन केल्यानंतर ऐश्वर्यानं मला एक खास गोष्ट सांगितली, “तुम्ही मला माझ्या ‘पा’ म्हणजेच महान अभिनेते अमिताभ बच्चन यांची आठवण करून देता.” त्यानंतर ऐश्वर्या राय ही सोनूला ‘भाईसाहब’ म्हणून हाक मारू लागली आणि तिथूनच दोघांमधील या सुंदर नात्याला सुरुवात झाली.

जोधा अकबर सिनेमामध्ये ऐश्वर्या व सोनू सूद यांच्या भूमिका

विशेष म्हणजे सोनू सूदचं बच्चन कुटुंबाशी खास नात राहिलं आहे. त्यानं अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याबरोबर काम केलं आहे. सोनूनं अमिताभ बच्चनबरोबर बुड्ढा… होगा तेरा बाप या चित्रपटात काम केलं होतं. तर, अभिषेक बच्चनसह ‘युवा’ व ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटांमध्ये त्यानं स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे सोनूचं बच्चन कुटुंबाबरोबर केवळ फक्त सिनेमांपुरतं आणि व्यावसायिक नातं नाही, तर आपुलकीचं नातंही असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, ऐश्वर्या रायला सख्खा मोठा भाऊ असून, आदित्य राय असं त्यांचं नाव आहे. आदित्य राय हे मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनीयर म्हणून काम करतात.