सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांना त्यांच्या दिसण्यावरुन, कपड्यांवरुन, रंगावरुन आणि वजनावरुन ट्रोल केलं जातं. विशेष करुन अभिनेत्रींवर अनेकदा यामुळे टीका होत असते, काही दिवसांपूर्वी कान्सला गेलेल्या ऐश्वर्या रायलाही ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. रेड कार्पेटवरील तिच्या लूकचं, ती ज्या पद्धतीने स्वत:ला प्रेजेंट करते त्याचं नेहमी कौतुक होतं, पण अनेकदा तिला तिच्या वजनामुळे ट्रोलही केलं जातं. ऐश्वर्याला ट्रोल केल्यानंतर काही अभिनेत्रींनी ट्रोलर्सला खडेबोल सुनावत तिला पाठिंबा दिला यापैकीच एक म्हणजे रवीना टंडन.
अभिनेत्री रवीना टंडनने काही महिन्यांपूर्वी ऐश्वर्या रायला कान्स चित्रपट महोत्सवमधील रेड कार्पेटवरील लूकमुळे सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे. तिने हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकिचं असल्याचं म्हटलं. तसंच, यामागे आजच्या डिजिटल संस्कृतीचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितलं.
ट्रोलिंग ही विषारी प्रवृत्ती – रवीना टंडन
यावर्षी मे महिन्यात ऐश्वर्या रायने दरवर्षीप्रमाणे कान्स चित्रपट महोत्सवामध्ये हजेरी लावली होती. डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेला निळ्या रंगाचा आकर्षक गाऊन परिधान करून ती रेड कार्पेटवर पोहोचली होती. मात्र, तिच्या या लूकमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडनने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, महिलांच्या दिसण्यावर सतत टीका करणे किंवा त्यांचे बारकाईने परीक्षण करणे ही सोशल मीडियाच्या काळातील विषारी प्रवृत्ती आहे.
रवीना टंडनने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “हे अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. एखाद्या स्त्रीचं वाढतं वय, तिचं वजन किंवा तिने घातलेल्या कपड्यांवर सतत टीका करणं आणि त्यावर अति लक्ष केंद्रित करणं ही आजच्या डिजिटल संस्कृतीतील एक विषारी प्रवृत्ती बनली आहे.” रवीना टंडनने यावेळी ऐश्वर्याला ग्लोबल आयकॉन म्हटलं आहे. ती पुढे म्हणाली, “ऐश्वर्या ही खऱ्या अर्थाने ग्लोबल आयकॉन आहे. अनेक दशकांपासून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तिच्यासारख्या यशस्वी, बुद्धिमान आणि मान-सन्मान मिळवलेल्या स्त्रीचे मूल्यमापन केवळ एका खराब कॅमेरा अँगलवर किंवा तिने घातलेल्या वेगळ्या कपड्यावरुन करणं, ही अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे.”
पुरुषांवर टीका होत नाही – रवीना टंडन
रवीना टंडनने सांगितलं की, महिलांच्या वाढत्या वयाबद्दल आणि त्यांच्या चेहऱ्यात किंवा शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल असलेले अति लक्ष समाजातील दुटप्पीपणा दाखवते. ती म्हणाली, “आपल्या समाजात अभिनेत्रींकडून २० वर्षांपूर्वी जशा दिसत होत्या, तसंच कायम दिसण्याची अपेक्षा केली जाते, पण पुरुष कलाकारांना मात्र वयानुसार बदलण्याची, वृद्ध होण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची मोकळीक दिली जाते. त्यांच्या बाबतीत महिलांप्रमाणे इतक्या कठोरपणे टीका केली जात नाही. ही समाजातील दुटप्पी मानसिकता आहे.”
रवीना टंडन व्यतिरिक्त माधुरी दक्षित आणि कंगना रणौत यांनीही ऐश्वर्या रायच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. कान्स चित्रपट महोत्सवमध्ये तिच्या लूकवरून सोशल मीडियावर झालेल्या टीकेनंतर या दोघींनीही ऐश्वर्याची बाजू घेत तिचं समर्थन केलं.
