Aishwarya Rai Vivek Oberoi Coca Cola Ad Viral: अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि अदांनी बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या रिलेशनशिप आणि वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली होती. आता ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांची जुनी कोको-कोला जाहिरात पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीतील दोघांची केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
या व्हायरल जाहिरातीत ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना दिसते. त्याचवेळी विवेक तिच्याकडे पाहत असतो. ऐश्वर्याचं त्याच्याकडे लक्ष जाताच ती मैत्रिणींना गंमतीने म्हणते, “बिचारा, बघ कशी विंडो शॉपिंग करतोय…” त्यानंतर ऐश्वर्या तिथून निघून गेल्यावर विवेक तिच्या टॅक्सीमध्ये गुपचूप स्वतःचा फोन ठेवतो. मित्राच्या फोनवरून स्वतःच्या नंबरवर फोन करत तो गंमतीने म्हणतो, “माझा फोन थोडा रोमँटिक आहे, विंडो शॉपिंग तर करत नाहीये ना.” फोनची लोकेशन समजल्यानंतर ऐश्वर्या तो फोन विवेककडे पाठवते. पुढे दोघेही एकत्र कोको-कोला पिताना दिसतात.
नेटकऱ्यांनी सलमान खानला केले टॅग
ऐश्वर्या आणि विवेक रिलेशनशिपमध्ये असतानाच्या काळातील ही जाहिरात असल्याने ती पुन्हा व्हायरल होताच नेटकऱ्यांनीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं, “विवेक आणि ऐश्वर्या दोघेही एकत्र छान दिसतायत.” अशी कमेंट केली. तर आणखी एका नेटकऱ्यानं, “सलमान खानने उगाचच मार दिला नव्हता.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “ही सलमान खानची आवडती जाहिरात असेल.” तर काहींनी सलमान खानला टॅग करत “बघ जरा, हे काय केलंय.” अशा मजेशीर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, सलमान खानबरोबरचं नातं संपल्यानंतर ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय रिलेशनशिपमध्ये होते. विवेकने त्यावेळी मीडियासमोर सलमान खानकडून धमक्या मिळाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि पुढे दोघेही वेगळे झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनबरोबर लग्न केलं. त्यांना आराध्या ही मुलगी आहे. दुसरीकडे, विवेक ओबेरॉयने २०१० मध्ये प्रियांका अल्वा ओबेरॉयबरोबर लग्न केलं.
