Bhola Movie Review : एकाच चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही गोष्टींची जबाबदारी लीलया पेलणारे फार कमी कलाकार आहेत. आज ‘भोला’ बघितल्यावर त्या यादीत अभिनेता अजय देवगणचं नाव अवश्य जोडावंसं वाटतं. याआधीसुद्धा अजय देवगणने असे प्रयत्न केले आहेत, पण ‘भोला’ हा त्या सगळ्यापेक्षा वेगळा, वरचढ आहे हे मात्र नक्की. अर्थात काही लोक या गोष्टीकडे आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक म्हणत नाकं मुरडतीलही पण रिमेक असूनही प्रेक्षकांना शेवटपर्यंत जो खुर्चीला खिळवून ठेवू शकतो तोच यात यशस्वी होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळ ‘कैथी’ हा चित्रपट आणि ‘भोला’ यामध्ये बऱ्यापैकी वेगळेपण तुम्हाला जाणवेल. अगदी कथेच्या मांडणीपासून, पात्रांपासून, संवादांपासून ते अचंबित करणाऱ्या अॅक्शन सीन्सपर्यंत सगळ्यामध्येच तुम्हाला एक खास अजय देवगण टच बघायला मिळतो. १० वर्षं काही कारणास्तव तुरुंगात असलेला भोला शिक्षा भोगून बाहेर पडतो, त्याला त्याच्या मुलीला भेटायचं असतं, पण मध्ये वाटेत काही वेगळ्याच गोष्टींमध्ये तो अडकतो आणि मग हळूहळू भोलाची कहाणी, त्याचा भूतकाळ आपल्यासमोर उलगडू लागतो. भोलाची पार्श्वभूमी, उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी, तिथल्या पोलिसांमधला संघर्ष, ड्रग माफिया आणि एकीकडे आपल्या मुलीला भेटण्यासाठी तरसलेला भोला अशी ही संपूर्ण एका रात्रीची कथा अत्यंत वेगवान पद्धतीने लोकेश कनगराज, अंकुश सिंग, श्रीधर दुबे यांनी मांडली आहे. पटकथादेखील तितकीच उत्कृष्ट असल्याने चित्रपट कुठेही तुम्हाला रटाळ, कंटाळवाणा वाटत नाही. संवादांच्या बाबतीत हा चित्रपट थोडी निराशा करतो, पण त्याकडे कानाडोळा केला तर ‘भोला’ हे पात्र आणि त्याचं कथानक आपल्या मनाला भिडल्याशिवाय रहात नाही.

आणखी वाचा : अजय देवगण, तब्बूचा ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी

ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे हा एक जबरदस्त ॲक्शनपट आहे आणि त्याबाबतीत मात्र तुम्हाला कुठेच नावं ठेवायची संधी देत नाही. अगदी सुरुवातीच्या सीनपासून शेवटपर्यंत तुम्हाला ॲक्शनची मेजवानी या चित्रपटात अनुभवायला मिळते. काही अॅक्शन सीन्स हे अत्यंत अंगावर येणारे आहेत. एक मास एंटरटेनर चित्रपट असल्याने अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी आपल्यासमोर घडत असतात, पण त्या घडतानाही आपण आ वासून बघत राहतो इथेच एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून अजय देवगण यशस्वी होतो. या ॲक्शनला रवी बसरूर यांचं अगदी समर्पक पार्श्वसंगीत त्यातल्या ॲक्शन सीन्सची मजा द्विगुणित करतं. खासकरून ट्रक आणि बाईक यांच्यातला पहिला चेसिंग सिक्वेन्स आणि शंकराच्या मंदिराबाहेर दाखवलेला एक ॲक्शन सीन हे दोन्ही सीन्स तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतील.

या सगळ्या गोष्टींना आणखी उंचावर नेऊन ठेवलंय ते यातील कलाकारांनी. अजय देवगण आणि तब्बू यांनी तर लाजवाब काम केलं आहेच त्यांच्याबरोबर इतरही सहकलाकारांनी तोडीस तोड काम केलं आहे. खासकरून आशु ही भूमिका साकारणारा दीपक डोबरियालचं काम पाहून आपल्याला प्रचंड चीड येते. गजराज राव, संजय मिश्रा यांनीही छोट्याश्या भूमिकेत अप्रतिम काम केलं आहे. तब्बूने साकारलेली कणखर पोलिस ऑफिसर डायना हीला सुरुवातीलाच आपण एका जबरदस्त ॲक्शन सीनमध्ये पाहतो त्यानंतर तिच्या वर्दीमागची एक हळवी आईदेखील आपल्याला बघायला मिळते. अजय देवगणचं ‘भोला’ हे पात्र हे अजय अक्षरशः जगलाय. अजय त्याच्या डोळ्यातून ज्या प्रकारचा अभिनय करतो त्यामुळे अगदी मोजके संवाद असूनही तो भाव खाऊन जातो, आणि ॲक्शनच्या बाबतीत त्याचा हात पकडणारं अद्याप तरी बॉलिवूडमध्ये कुणी नाही.

अर्थात या चित्रपटातही काही कमकुवत बाजू आहेत. यातील नकारात्मक पात्रांवर चित्रित केले गेलेले काही सीन्स हे थोडे बालिश वाटतात. शिवाय ‘भोला’चा भूतकाळ आणि एका छोट्याशा गाण्यात उरकल्यामुळे त्याच्या भूतकाळाशी आपण जोडले जात नाही. पुढील येणाऱ्या भागात ‘भोला’च्या आयुष्याशी संबंधीत काही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा ठेवूच शकतो. आणखीनही काही छोट्या मोठ्या उणिवा आहेत, पण या सगळ्याकडे कानाडोळा केला तर एक मसालापट म्हणून ‘भोला’ हा बॉक्स ऑफिसवर लोकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरेल. बॉलिवूडकडून जो ॲक्शनपट अपेक्षित होता त्याची कमी ‘भोला’ नक्की भरून काढेल आणि रेकॉर्ड ब्रेकिंग कमाईही करेल. याबरोबरच चित्रपटाच्या शेवटी एक सरप्राइजदेखील आहे ते पाहायला अजिबात विसरू नका.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan and tabbu starrer bholaa movie review in marathi avn
First published on: 30-03-2023 at 14:18 IST