Raid 2 Box Office Collection Day 6: सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगण व रितेश देशमुख यांच्या ‘रेड २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. १ मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सिकंदर’, ‘जाट’, ‘केसरी चॅप्टर २’, ‘फुले’, ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटांच्या तुलनेत ‘रेड २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. या चित्रपटातील अजय देवगण व सौरभ शुक्ला यांच्यातील द्वंद प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. तेव्हापासून ‘रेड’ चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अखेर १ मेला ‘रेड २’ चित्रपट प्रदर्शित झाला. सहा वर्षांनी अमय पटनायक पुन्हा एकदा धाड टाकली. ‘रेड २’ चित्रपटात अजय देवगण नायक असला तरी त्याच्या तोडीस असा खलनायक रितेश देशमुखला दाखवण्यात आलं आहे. रितेश दादा मनोहर भाईच्या भूमिकेत झळकला आहे.
‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.७१ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कधी कमाईत घट झाली तर कधी वाढ पाहायला मिळाली. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘रेड २’ चित्रपटाने सहाव्या दिवशी फक्त ६ कोटींचं कलेक्शन केलं आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ८७.३० कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘रेड २’ चित्रपटाची सहा दिवसांची कमाई
- पहिल्या दिवशी – १९.७१ कोटी
- दुसऱ्या दिवशी – १३.०५ कोटी
- तिसऱ्या दिवशी – १८.५५ कोटी
- चौथ्या दिवशी – २२.५३ कोटी
- पाचव्या दिवशी – ७.४७ कोटी
- सहाव्या दिवशी – ६ कोटी
- एकूण कमाई – ८७.३० कोटी
‘रेड २’ चित्रपटाची कथा
चित्रपटात अजय देवगणने भूराजस्व अधिकारी अमय पटनायकची भूमिका साकारली आहे. हा अमय पटनायक नेता दादा भाईच्या घरावर छापा टाकतो. आतापर्यंतच्या अमयच्या करिअरमधील त्याचा हा ७५वा छापा असतो. या छापेमारीत बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि मग तो दादा भाईचा काळा पैसा लोकांसमोर कसा आणतो? हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान, ‘रेड २’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार आणि गौरव नंदा यांनी सांभाळली आहे. तसंच राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख व्यतिरिक्त वाणी कूपर रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाला महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.