Drishyam 3 Ajay Devgn Mohanlal Approval Story: अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ शुक्रवारी (२ ऑक्टोरबरला) रिलीज होतोय. या चित्रपटात अजय पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे मूळ मोहनलाल यांच्या मल्याळम ‘दृश्यम ३’ पेक्षा हिंदी फ्रँचायझीच्या या शेवटच्या भागाची कथा पूर्णपणे वेगळी ठेवण्यात आली आहे. कथानकात मोठा बदल केल्यामुळे अजय देवगणने स्वतः मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली, मात्र, मोहनलाल यांनी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही.
‘फिक्की फ्रेम्स’शी बोलताना अजय देवगणने मोहनलाल यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. “खरं तर मी लाल सरांना (मोहनलाल) फोन केला होता आणि त्यांनी चित्रपट पाहावा अशी विनंती केली होती. आलोक जैनने सांगितल्याप्रमाणे मल्याळम टीम खूप चांगलं काम करतेय. मात्र यावेळी आम्ही कथानकात पूर्णपणे बदल केला आहे. त्यामुळे मोहनलाल सरांचं अप्रूव्हल आलं तर ते योग्य राहील असं मला वाटलं. त्यांनी चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा होती, पण ते सध्या सुट्टीवर आहेत. तरीही ते सातत्याने संपर्कात आहेत. मला वाटते की ते लवकरच तिथे हा चित्रपट पाहतील,” असं अजय देवगण म्हणाला.
दृश्यम २ पेक्षाही भारी आहे तिसरा भाग – अजय देवगण
चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही फ्रँचायझी संपवण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल अजय देवगणने सांगितलं. ‘दृश्यम’ सारख्या चित्रपटाची कथा लिहिणं खूप आव्हानात्मक असतं. टीमला ही कथा एका चांगल्या वळणावर संपवायची होती आणि ज्या प्रकारे पटकथा व चित्रपट तयार झाला आहे, ते पाहता थांबण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असं त्यांना वाटलं. “मी कालच हा चित्रपट पाहिला आणि माझं वैयक्तिक मत आहे की हा ‘दृश्यम २’ पेक्षाही भारी आहे. अशी कथा लिहिणं सोपं नसतं. लेखक आणि दिग्दर्शकांच्या क्षमतांना मर्यादा असतात,” असं अजय देवगण म्हणाला.
दृश्यम ३ ची कथा ही पूर्णपणे वेगळ्या मर्डर मिस्ट्रीवर आधारित नाही, तर ती मागच्या चित्रपटातील घटनांशी जोडलेली आहे. फक्त फ्रँचायझी पुढे चालू ठेवण्यासाठी सीक्वल न बनवता, ‘दृश्यम’च्या कथेत बसू शकेल अशी कथा लिहिणं हा टीमचा उद्देश होता. अजयच्या मते, या चित्रपटात अपेक्षित असलेले ट्विस्ट, टर्न्स आणि शॉक फॅक्टर देणारी ही कथा निवडण्यापूर्वी लेखक आणि दिग्दर्शकाने चार वेगवेगळ्या पटकथा तयार करून त्या रद्द केल्या.
दरम्यान, ‘दृश्यम: द कन्क्लुजन’मध्ये अजय देवगण, श्रिया सरण, इशिता दत्ता, तब्बू, रजत कपूर, जयदीप अहलावत व प्रकाश राज हे कलाकार आहेत. अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होतोय.
