Sanjeeda Sheikh: अजय देवगण लवकरच ‘धमाल’ या कॉमेडी फ्रँचायझीचा सिक्वेल, ‘धमाल ४’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा १० जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीबरोबर दिसणार आहे. टीव्ही जगतात अभिनेत्रीने विविध भूमिकांतून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. याबरोबरच तिने वेब सीरिज आणि बॉलीवूडमध्येही काम केले आहे. ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. संजीदा शेख असे या अभिनेत्रीचे नाव आहे.
संजीदा शेखबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
अभिनेत्री संजीदा शेख तिच्या भूमिकांमुळे कायमच चर्चेत असते. पण, याबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. अभिनेत्रीने २००५ मध्ये ‘क्या होगा निम्मो का’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
त्यानंतर तिने ‘कयामत’, ‘एक हसीना थी’, ‘इश्क का रंग सफेद’ यांसारख्या मालिकांत प्रमुख भूमिका साकारली. संजीदाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. संजीदाने ‘क्या दिल में है’ या मालिकेत काम केले. यामध्ये आमिर अली प्रमुख भूमिकेत होता. आमिर व संजीदाची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबरोबरच त्यांच्या खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्यात जवळीक वाढली होती, ते प्रेमात पडले आणि २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले.
लग्नाच्या सात वर्षांनंतर संजीदा व आमिर यांना सरोगसीद्वारे एक मुलगी झाली, तिचे नाव आयरा असे आहे. मात्र, पालक झाल्यानंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. २०२० मध्ये ते वेगळे झाले. २०२१ ला त्यांनी घटस्फोट घेतला. आता ४१ वर्षीय अभिनेत्री तिच्या मुलीबरोबर राहते.
अभिनेत्री ‘धमाल ४’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार
दरम्यान, संजीदा आता ‘धमाल ४’मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, धमाल ४ गाजणार का, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
