Ajay Devgn Drishyam 3 Trailer release : विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाने केलेल्या खुनाचे रहस्य उलगडणार का याबाबत सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावेळी समीर देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती नवीन पुरावा लागला असून, त्यामुळे विजयच्या हृदयाची धडधड वाढल्याचे दिसून येत आहे.

क्राइम व थ्रिलर असलेल्या ‘दृश्यम’ या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या सिनेमाचा सीक्वेलसुद्धा तेवढाच गाजला. आता गोव्यातील पणजीमध्ये २ ऑक्टोबरला नेमकं काय झालं होतं आणि त्या हत्येचे रहस्य समोर येणार आहे. ‘दृश्यम’च्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला असून, येत्या २ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

‘दृश्यम ३’ मध्ये काय असणार गोष्ट?

‘दृश्यम २’ सिनेमाची गोष्ट जिथे संपली होती, तिथूनच तिसऱ्या भागाची सुरुवात होत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच पोलीस महानिरीक्षक मीरा देशमुख ही लेखकाला विजयच्या कहाणीच्या सीक्वेलबद्दल विचारत असते. त्यावर लेखक, ‘विजय पुढे काय करणार याबद्दल फक्त स्वतः विजय नाही तर देवच सांगू शकतो,’ असे म्हणतो. त्यानंतर विजय चिंता व्यक्त करीत पोलिसांच्या हाती पुरावा लागल्याचा उल्लेख करतो. यावेळी त्याची बायको व मुलगी आगीमध्ये काहीतरी कागदी पुरावे नष्ट करत असल्याचे दिसून आले आहे.

‘दृश्यम: द कन्क्लुजन’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टारची एन्ट्री झाल्याचे दिसून आले आहे. सुप्रसिद्ध वकील म्हणून प्रकाश राज हे ‘दृश्यम ३’मध्ये दिसून आले आहेत. त्याचबरोबर विजय साळगावकरसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी ‘एसपी क्राईम ब्रॅंच’ हे नवीन पात्र असणार आहे. याआधीच्या भागामध्ये अक्षय खन्नाने प्रभावी भूमिका साकारली होती; पण यावेळी तो सिनेमातून बाहेर पडल्यानंतर आता नवीन ‘एसपी क्राईम ब्रँच राजवीर सिंग तोमर’ ही भूमिका गाजणार आहे. जयदीप अहलावत हे पात्र साकारले असून, तो आता विजयसमोर नवे आव्हान निर्माण करणार आहे.

यावेळी समीरचे वडील हे “आम्हाला मुलासाठी न्याय पाहिजे”, असे म्हणतात तर यावर आयजी मीरा देशमुख म्हणते, “यावेळी न्याय नाही तर बदला हवा आहे.” ‘दृश्यम: द कन्क्लुजन’च्या ट्रेलरमध्ये साळगावकर कुटुंब चिंतेत आणि पोलीस हे हाती पुरावा लागल्याच्या विश्वासात दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विजय साळगावकर पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन या केसमधून बाहेर पडणार की, यावेळी पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, अजय देवगण व तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळाले होते. त्यानंतर आता या फ्रँचायजीचा शेवटचा भाग ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे दिग्दर्शन अभिषेक पाठकने केले असून, पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.