ajay devgn बॉलिवूडचा 'सिंघम' अभिनेता अजय देवगणने त्याच्या विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम स्थापित केले आहेत. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. काही चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये आहेत, तर काही चित्रपट दोनशे आणि तीनशे कोटींच्या पुढे पोहोचले आहेत. यामध्ये 'सिंघम', 'दृश्यम', 'दृश्यम २', 'रेड' अशा चित्रपटांचा समावेश आहे. अजय देवगण काही चित्रपटांची निर्मितीही करतो. त्यामुळे अभिनेता म्हणून मिळणाऱ्या पैशांव्यतिरिक्त त्याला निर्मिती संस्थेतूनही उत्पन्न मिळते. सिनेसृष्टीतील या कमाईसह आता अजयला आणखी एक मोठा आर्थिक लाभ होणार आहे. अजयने त्याचं मुंबईतील व्यावसायिक कार्यालय भाड्याने दिलं आहे, ज्यातून त्याला मोठा धनलाभ होणार आहे. मुंबईच्या गजबजलेल्या अंधेरी परिसरात अजय देवगणचे व्यावसायिक कार्यालय आहे. या महिन्यात भाडेकरार होणार असून, हा करार झाल्यानंतर अजय देवगणला दरमहा ७ लाख रुपये भाडे मिळणार आहे. या करारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क १.१२ लाख रुपये आकारण्यात आले आहे. हेही वाचा.Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार अंधेरीतील वीरा देसाई रस्त्यावरील ओशिवरा भागात हे कार्यालय आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. या जागेपासून अनेक मुख्य महामार्ग, मेट्रो स्थानकं आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी कमी अंतरावर आहेत. व्यवसायांना उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या कार्यालयीन जागेसाठी हे ठिकाण खूपच लोकप्रिय ठरलं आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या अहवालानुसार, अजयने भाड्याने दिलेलं कार्यालय हे ३,४५५ चौ. फूट (३२१ चौ. मीटर) विस्तारित आहे, आणि त्यामध्ये तीन कार पार्किंग स्पेसचा समावेश आहे. हा करार ३० लाख रुपयांच्या अनामत ठेवेसह करण्यात आला असून, या कराराचा कालावधी साठ महिन्यांचा (५ वर्षांचा) आहे. अजयचं व्यावसायिक कार्यालय जिथे आहे, त्याच प्रकल्पात अजय आणि त्याची पत्नी काजोलच्याही अनेक मालमत्ता आहेत. या करारामुळे अजयच्या उत्पन्नात काही कोटींची वाढ होणार आहे. हेही वाचा.“एकाच इमारतीत राहूनही करीना माझ्याकडे दुर्लक्ष करायची”, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’च्या दिग्दर्शकाचं वक्तव्य आगामी चित्रपटांमध्ये आकड्यांचा खेळ अजय केवळ कमाईतच कोटींच्या आकड्यांचा खेळ खेळत नाही, तर त्याच्या आगामी चित्रपटांच्या नावातही आकड्यांचा खेळ असणार आहे. अजयच्या आगामी चित्रपटांमध्ये 'रेड २', 'दे दे प्यार दे २', आणि 'सिंघम'चा तिसरा भाग म्हणजेच 'सिंघम अगेन' या चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट अजयच्या आधी आलेल्या चित्रपटांचे सिक्वेल किंवा पुढील भाग आहेत. अजयने आजवर 'गोलमाल'च्या १ ते ४ भागांमध्ये काम केलं असून, 'गोलमाल'चा पाचवा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे संकेत या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी दिले आहेत. तसेच, अजयने 'दृश्यम'च्या दोन भागांमध्ये काम केले असून, 'दृश्यम २' या चित्रपटाचा पुढील भाग येऊ शकतो असा चित्रपटाचा शेवट दाखवण्यात आला आहे.