Ajay Devgan not talking to Anubhav Sinha for 19 years : एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला की दिग्दर्शक आणि कलाकारांमधील समीकरण कसं बदलतं, याचं जळजळीत उदाहरण दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी मांडलं आहे. ‘रा.वन’, ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल १५’ सारखे उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट अभिनेता अजय देवगणबरोबर बनवला होता. ‘कॅश’ असं या मल्टिस्टारर चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटाच्या अपयशानंतर अजय देवगण इतका नाराज झाला की, त्याने गेल्या १९ वर्षांत अनुभव सिन्हा यांच्याशी एक शब्दही बोललेला नाही. अनेक मेसेज करूनही अजयने त्याला उत्तर दिलं नसल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.
त्या फ्लॉप चित्रपटानंतर आम्ही कधीच भेटलो नाही- अनुभव सिन्हा
कॅश चित्रपट फ्लॉप झाल्याचा परिणाम अजय देवगणबरोबरच्या नात्यावर परिणाम झाला आणि आम्ही दोघे पुन्हा कधीच भेटलो नाहीत, असं अनुभव सिन्हा यांनी उल्टा चष्मा (यूसी) या यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितलं. “अजय देवगण खूप चांगला माणूस आहे. पण कधीकधी जेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालत नाहीत तेव्हा लोक वेगळे होतात. मी अजयबरोबर माझ्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट ‘कॅश’ बनवला. तो खरंच खूप वाईट चित्रपट आहे आणि चित्रपटातील लोकांना त्यासाठी नाराज व्हायचा पूर्ण अधिकार आहे. तो खरंच एक बेजबाबदार चित्रपट होता. त्या फ्लॉप चित्रपटानंतर अजय आणि मी वेगळे झालो. आम्हाला पुन्हा कधीही एकमेकांना भेटण्याची संधी मिळाली नाही,” असं अनुभव सिन्हा म्हणाले.
मी त्याला बरेच मेसेज पाठवले, पण… – अनुभव सिन्हा
अजय देवगण तब्बल १९ वर्षांपासून आपल्याशी बोलत नसल्याचं अनुभव सिन्हा यांनी द लल्लनटॉपशी बोलताना सांगितलं होतं. “आम्ही कधीच भांडलो नाही. तो माझ्याशी बोलत नाही आणि मला त्याचं कारण माहीत नाही. ‘कॅश’ सिनेमा बनवल्यानंतर आम्ही भेटलोच नाही, त्यामुळे तो माझ्याकडे दुर्लक्ष करतोय असंही मी म्हणू शकत नाही. कदाचित मी जास्त विचार करत असेन. पण मी त्याला बरेच मेसेज पाठवले, पण त्याने कधीच उत्तर दिलं नाही. म्हणून मी स्वतःला समजावलं की कदाचित माझे मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचले नसतील. पण १९ वर्षे झाली आहेत, आम्ही पुन्हा कधीच बोललो नाहीत,” असा खुलासा अनुभव सिन्हा यांनी केला.
कॅश चित्रपटातील कलाकार व कलेक्शन
‘कॅश’ चित्रपटात २००७ साली आला होता. या चित्रपटात अजय देवगणबरोबर सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, झायेद खान, शमिता शेट्टी, आयशा टाकिया आणि दिया मिर्झा या कलाकारांची मांदियाळी होती. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट ३२ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने फक्त १८.५७ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाले होते.
