अजय देवगणकडे पाहून तो अजिबात मस्करी करत नसेल, असं वाटतं. पण त्याच्या प्रँकचे काही किस्से खूप लोकप्रिय आहेत. त्याने करीना कपूर, परिणीती चोप्रा यांच्याबरोबर प्रँक केले आहेत. त्याने स्वतः अनेकदा किस्से सांगितले. एकदा तर अजयच्या प्रँकमुळे एका महिलेने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अजयने स्वतः एकदा त्याच्या प्रँकबद्दल सांगितलं होतं. अजयच्या एका प्रँकमुळे त्याच्या सह-अभिनेत्याच्या पत्नीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. अजय म्हणाला की त्याच्या सह-अभिनेत्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याने त्याच्या पत्नीबरोबर प्रँक केला. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, पण अजय तिला म्हणायचा की तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. अजय मस्करी करतो हे माहीत होतं तरीही तिने त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला.
“आम्ही रात्री शूटिंग करायचो, त्यामुळे ती सकाळी तिच्या पतीला भेटायची. आम्ही त्याच्या पत्नीला सांगत होतो की तिच्या पतीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर आहे आणि तो रात्री कुठेतरी जातो. रात्रीचे शूटिंग सुरू नाही. मी तिला सांगायचो की मी रात्री १०.३० वाजता माझ्या खोलीत परत येतो. ती मला म्हणायची की तिने माझ्या प्रँकबद्दल ऐकलंय आणि तिला तिच्या पतीवर विश्वास आहे. हे असं आठ दिवस सुरू होतं. नवव्या दिवशी, जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा आम्हाला समजलं की तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत आणि तिला रुग्णालयात दाखल केलंय,” असं अजय म्हणाला होता.
अजय देवगणच नाही तर रोहित शेट्टीही प्रँक करतो. या दोघांनी ‘गोलमाल ३’ चे शूटिंग सुरू असताना करीनाला भूताची गोष्ट सांगून घाबरवलं होतं. करीना स्वतः एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.
करीनाने सांगितलेला किस्सा
“अजय मला हॉटेलमध्ये भूतांच्या गोष्टी सांगून घाबरवत असे. अर्थातच मी अशा गोष्टी ऐकून घाबरते आणि त्याला गप्प राहा म्हणून ओरडते. पण तो औकत नाही. एक असं हॉटेल आहे ज्याच्या आजूबाजूला मानवी वस्ती नाही, तिथे क्वचितच बाहेरून लोक येतात त्यामुळे या जागेची भीती वाटते,” असं करीना म्हणाली होती.
करीनाबरोबर केलेला प्रँक
एकदा अजयने करीनावर नकली बॉम्ब टाकून प्रँक केला होता. “त्याने हिरव्या रंगाचा बॉम्ब आणला, तो बॉम्ब फुटत नाही पण अगदी खऱ्यासारखा दिसतो. अजयने सिगारेट वापरून तो पेटवला आणि करीनावर फेकला. करीनाला विश्वासच बसला नाही की अजय असं काहीतरी करू शकतो. ती ओरडली आणि तिथून पळून गेली. बाकीचे सगळे मात्र असत होते,” असा एक किस्सा चित्रपटाच्या टीममधील सदस्याने सांगितला होता. अजय स्वतःही प्रँकचे अनेक किस्से सांगत असतो.