Ajay Devgn on Tabu: तब्बू ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पहला पहला प्यार, विजयपथ, प्रेम, हिंमत अशा अनेक सिनेमांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तिने अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केले आहे. अजय देवगणबरोबर तिने ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘भोला’ आणि ‘औरों में कहाँ दम था’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विशेष म्हणजे फक्त स्क्रीनवरच त्यांची केमिस्ट्री गाजली नाही तर खऱ्या आयुष्यात त्यांचे उत्तम बॉण्डिंग आहे. त्यांच्यातील मैत्री अनेकदा लक्ष वेधून घेते.
“तब्बूला मी हवा आहे आणि मी…”
अजय व तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून त्यांची एकमेकांशी ओळख आहे. विविध मुलाखतींमध्ये जेव्हा ते एकत्र हजेरी लावतात, त्यावेळी ते एकमेकांचे किस्से सांगतात. त्यांच्या मैत्रीबद्दल बोलतात. तसेच, एकमेकांची चेष्टा करतानाही दिसतात.
एका मुलाखतीत तब्बूला कसा मुलगा हवा आहे, यावर अजय देवगणने मिश्किलपणे उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे. नवोदय टाईम्सला तब्बू व अजय देवगणने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत विचारले होते की तब्बूला पती म्हणून कसा मुलगा हवा आहे? यावर अजय देवगण मजेशीरपणे म्हणालेला, “तब्बूला मी हवा आहे आणि मी तिला मिळू शकत नाही”, अजयच्या या वक्तव्यावर त्याच्यासह तब्बूही हसली होती. त्यानंतर अजय म्हणालेला, “माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखा कोणीतरी तिला हवा आहे. पण, माझ्यासारखा दुसरा व्यक्ती या जगात नाही.”
अजय व तब्बू यांच्यात उत्तम मैत्री असल्याचे वेळोवेळी दिसते. तसेच, तेही त्यांच्या मैत्रीबद्दल अनेकदा सांगतात. मात्र, तब्बू व लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते.काही रिपोर्ट्सनुसार, तब्बू व नागार्जुन १५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. नागार्जुन यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. त्यामुळे तब्बूने नात्यातून माघार घेतली. मात्र, दोघांनीही अधिकृतपणे यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. आता या सगळ्यानंतर नागार्जुन व तब्बू पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
नागार्जुन यांनी त्यांच्या १०० व्या सिनेमाची घोषणा केली. आता या प्रोजेक्टमध्ये तब्बूदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहते या दोघांना पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
