१९९१ ला प्रदर्शित झालेल्या ‘फूल और काँटे’ या चित्रपटातून पदार्पण करत अजय देवगणने बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर अभिनेत्याच्या ‘दिल है बेताब’, ‘हलचल’, ‘जख्म’, ‘परवाना’, ‘रेनकोट’, ‘सिंघम’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल’ अशा अनेक चित्रपटांतील भूमिका प्रचंड गाजल्या.

अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल खुलासा केला होता. अगदी कमी वयात त्याने दारू प्यायला सुरुवात केली होती. तो जेव्हा १४ वर्षांचा होता, त्यावेळी त्याने मित्रांच्या आग्रहावरून पहिल्यांदा दारू प्यायली होती. त्याला वाटले होते की ते एका वेळेपुरते मर्यादित असेल, पण तसे झाले नाही, ती त्याची सवय बनली.

अजय देवगण म्हणालेला, “पहिल्यांदा मी फक्त चव बघितली होती, त्यानंतर दारू माझ्या दिनचर्येचा भाग बनली. मी अनेकदा दारू सोडण्याचा निर्णय घेतला, पण दारू सोडणे सोपे नव्हते.

Award Banner

“मी खूप दारू…”

स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगण म्हणालेला, “मी प्रामाणिकपणे सांगतो, मी जे करतो ते मी लपवत नाही. मी खूप दारू प्यायचो. मी त्या पॉइंटला पोहोचलो होतो की मी लोकांना हे सांगू इच्छित होतो की दारू त्या लोकांसाठी नाही, ज्यांनी कधीच मद्यपान केलेले नाही. जे प्रमाणात मद्यपान करतात, त्यांच्यासाठी दारूचे सेवन करणे ठीक आहे. त्यानंतर मी वेलनेस स्पामध्ये गेलो आणि मी मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे सोडले.”

अभिनेता याबद्दल अधिक माहिती देत म्हणाला, “त्यावेळी मी माल्टचे सेवन करत नसे, आता मी माल्टचे सेवन करतो. माझ्यासाठी ते मद्यपान नाही. ३० मिली किंवा ६० मिली तुमच्या जेवणाबरोबर तुम्ही सेवन करू शकता. पण, ही मर्यादा मी कधीही पार केली नाही.” अजय देवगण ज्या माल्ट दारूचे सेवन करतो, त्याच्या एका बाटलीची किंमत ६० हजार इतकी आहे.

गेल्या वर्षी अजय देवगणने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तो खुलासा करत म्हणालेला, “मला कितीही दारू पाजली तरी मला ती चढत नाही, त्याची नशा होत नाही; जी व्यक्ती मद्यपान करते, तिला दारू प्यायल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे, नाहीतर त्या व्यक्तीने दारू प्यायली नाही पाहिजे. असे अनेक लोक आहेत, जे दारूचे सेवन केल्यानंतर राग व्यक्त करताना दिसतात किंवा काही जण काहीही बरळतात, काहीही सांगतात.”

दरम्यान, अभिनेता ‘दृश्यम ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.