Ajay Devgn per minute remuneration: कलाकारांच्या मानधनाबद्दल वेळोवेळी चर्चा होताना दिसते. कलाकार कोणत्या चित्रपटासाठी, कोणत्या भूमिकेसाठी किती मानधन घेतात याबद्दल अनेकदा माहिती समोर येत असते. काही वेळा कलाकारही स्वत: त्याबद्दल खुलासा करतात. अलीकडील काळात कलाकार मोठ्या प्रमाणात मानधन घेतात. याबरोबरच, कलाकारांबरोबरच त्यांचे काम सांभाळणारा गटही त्यांच्याबरोबर असतो, त्याचाही खर्च वाढतो असे अनेक निर्माते, दिग्दर्शक यांनी वक्तव्य केले आहे.
अभिनेता अजय देवगणही त्याच्या भूमिकांसाठी जास्त मानधन घेतो. प्रत्येक चित्रपटासाठी तो मोठ्या प्रमाणात मानधन घेतो. एका दाक्षिणात्य चित्रपटात फक्त काही मिनिटांच्या भूमिकांसाठी त्याने मोठी रक्कम घेतली होती. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता हा सिनेमा नेमका कोणता याबद्दल जाणून घेऊ…
अजय देवगणने आठ मिनिटांसाठी किती घेतले मानधन?
अजय देवगणने काम केलेला हा दाक्षिणात्य सिनेमा म्हणजे आरआरआर. हा सिनेमा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात गाजला होता. २०२२ ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर हे प्रमुख भूमिकेत दिसले होते. आलिया भट्टनेही या सिनेमात १५ ते २० मिनिटांची भूमिका साकारली होती. तसेच, अजय देवगण पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत होता.
एस. एस. राजामौली दिग्दर्शित या अॅक्शन सिनेमात अजय देवगणने व्यंकट रामा राजूची भूमिका साकारली होती. तो चित्रपटात फक्त आठ मिनिटांसाठी दिसला, पण त्या काही मिनिटांतच त्याने त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणने आपल्या आठ मिनिटांच्या भूमिकेसाठी निर्मात्यांकडून ३५ कोटी रुपये घेतले, म्हणजेच प्रत्येक मिनिटासाठी ४.३५ कोटी रुपये घेतले.
आयएमडीबीनुसार, या सिनेमाचे बजेट ५५० कोटी इतके होते. या चित्रपटाने भारतात ९१५ कोटींची कमाई केली आणि जगभरात १२३० कोटींची कमाई केली. आरआरआर हा २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. भारतातील टॉप ७ सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्येही याचा समावेश आहे. हा सिनेमा ZEE5 वर उपलब्ध आहे.
