Ajinkya Deo Ramayana Role: नितेश तिवारी दिग्दर्शित भव्यदिव्य ‘रामायण’ या बॉलिवूड चित्रपटात ज्येष्ठ मराठी अभिनेते अजिंक्य देव ऋषी विश्वामित्रांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये त्यांचा पहिला लूक समोर आला असून प्रेक्षकांकडून त्याला पसंती मिळत आहे. ही भूमिका अत्यंत वास्तववादी पद्धतीने साकारल्याचं श्रेय त्यांनी दिग्दर्शक नितेश तिवारींना दिलंय. “माझी या भूमिकेसाठी देवानेच केली,” असंही त्यांनी म्हटलंय.

“हा अनुभव अत्यंत आध्यात्मिक होता आणि ही भूमिका साक्षात देवानेच माझ्या नशिबात लिहिली होती. मी या भूमिकेकडे फक्त एका चित्रपटातील पात्र म्हणून कधीच पाहिलं नाही. ‘रामायण’मधील पात्रांची निवड साक्षात देव करतो, असा माझा विश्वास आहे. त्यामुळेच ऋषी विश्वामित्रांची भूमिका साकारण्यासाठी माझी निवड झाली आहे,” असं अजिंक्य देव म्हणाले.

ऋषी विश्वामित्रांनीच माझं अस्तित्व स्वीकारलंय असं वाटलं

‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना अजिंक्य यांनी सांगितलं की, त्यांनी या भूमिकेसाठी तयार केलेला खास पोशाख आणि प्रोस्थेटिक मेकअप लावला होता. अजिंक्य देव म्हणाले, “जेव्हा मी ऋषींची वेशभूषा केल्यावर मी विश्वामित्रांची भूमिका स्वीकारण्यापेक्षा ऋषी विश्वामित्रांनीच माझं अस्तित्व स्वीकारलंय असं मला वाटलं.” इतकंच नाही तर सेटवरील सहकलाकार आणि तंत्रज्ञांनी “तुम्ही या भूमिकेसाठी अगदी योग्य दिसता,” अशा प्रतिक्रिया दिल्यामुळे अजिंक्य यांचा आत्मविश्वास आणखी वाढला.

दिग्दर्शक नितेश तिवारींचा प्रामाणिक दृष्टिकोन

ऋषी विश्वामित्र हे व्यक्तिमत्त्व खूप महान आणि भव्य आहे. त्यामुळे अभिनयात कोणतीही अतिशयोक्ती न होता अभिनय खरा वाटेल, याची काळजी दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी घेतली, असं त्यांनी सांगितलं. “याचं श्रेय नितेश तिवारींना जातं. त्यांनी मला अभिनयात अतिरेक करू दिला नाही किंवा हे पात्र मुळातच भव्य-दिव्य असल्याने तसं करण्याचा प्रयत्नही करू दिला नाही, कारण विश्वामित्रांचे व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी आहे. त्या पात्राचा लूकच अत्यंत प्रभावी होता आणि नितेश यांनी माझा अभिनय खरा राहील याची काळजी घेतली.”

‘रामायण’मधील ऋषी विश्वामित्रांची महत्त्वाची भूमिका

रामायणात ऋषी विश्वामित्रांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पवित्र यज्ञाचे रक्षण करण्यासाठी ते प्रभू राम आणि लक्ष्मणाला अयोध्येतून सोबत घेऊन जातात. तसेच त्यांना दिव्यास्त्रांची ओळख करून देतात. त्यानंतर ते त्यांना मिथिला येथे घेऊन जातात, तिथे प्रभू राम आणि सीता यांची भेट होते. इथूनच कथेतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींना सुरुवात होते.

‘रामायण’मधील कलाकारांची मांदियाळी

रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, अजिंक्य देव, रकुल प्रीत सिंग, रवी दुबे, लारा दत्ता, अरुण गोविलसह अनेक कलाकारांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.