Akanksha Puri : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आकांक्षा पुरीचं नाव चर्चेत आहे. एका फॅशन शोमध्ये टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा पुरीने पैठणी साडी आणि त्यावर बिकीनी स्टाईलचा पैठणीचा ब्लाऊज घातला होता. यावरुन तिला प्रचंड ट्रोल केलं जातं आहे. पण आकांक्षा पुरी आणि वाद हे नातं नवं नाही. याआधीही ती वादाच्या भोवऱ्यात अनेकदा अडकली आहे. आपण जाणून घेऊ अभिनेत्री आकांक्षा पुरी कुठल्या वादांमध्ये अडकली आहे?

पैठणीच्या बिकिनीचा वाद नेमका काय?

काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये डिझायनर रोहित वर्माच्या शोला आकांक्षा पुरीने पाहुणी म्हणून हजेरी लावली. बिपाशा बसू शो-स्टॉपर होती, पण सर्वांच्या नजरा आकांक्षावर खिळल्या होत्या. या कार्यक्रमासाठी तिने पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साडी निवडली , पण त्यासोबत तिने बिकिनी ब्लाउज घातला होता. पैठणी आणि बिकिनी ब्लाऊज यामुळे नेटकऱ्यांनी आकांक्षा पुरीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं.

पैठणी साडीची वाट लावलीस म्हणत आकांक्षाचं जोरदार ट्रोलिंग

आकांक्षा पुरी ही त्या लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र, तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, अनेकांनी तिच्या साडी नेसण्याच्या स्टाईलवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली. पैठणीसारखी सुंदर साडी आणि त्यावर बिकीनी ब्लाऊज, म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे, असं अनेकांनी म्हटलं. तर काहींनी तिच्या फॅशन सेन्सवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पैठणी साडीची सगळी वाट लावली, अशी कमेंटही काहींनी केली. दरम्यान आकांक्षानेही यावर ट्रोलर्सना उत्तर दिलं.

Akanksha Puri
पैठणीवर बिकिनी ब्लाऊज घातल्याने आकांक्षा पुरी ट्रोल. काय आहे नेमका वाद? (फोटो-आकांक्षा पुरी, इन्स्टाग्राम)

आकांक्षा पुरीचं ट्रोलर्सना उत्तर काय?

“माझं या लूकबद्दल खूप कौतुक झालं आहे. पण मला असं वाटतं की जिथे कौतुक होतं, तिथे तोडंफार ट्रोलिंग होणारच. मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणं पसंत करते, माझं लक्ष सकारात्मकतेवर असतं” तसंच आकांक्षा म्हणाली की जो ड्रेस आणि लूक तिने निवडला तो तिचा निर्णय नव्हता. ती डिझायनरची संकल्पना होती. ही साडी आणि ब्लाउज प्रसिद्ध डिझायनर रोहित वर्मा यांनी माझ्यासाठी खास डिझाइन केलं होतं असं तिने सांगितलं. “ही रोहित वर्मा यांची निर्मिती होती. मला त्याच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी मला ती साडी नेसायला दिली आणि त्यावर तो ब्लाऊज दिला, त्याअर्थी त्यांनी ते नक्कीच विचारपूर्वक डिझाइन केले असणार. एक कलाकार म्हणून, मी त्यांच्या संकल्पनेचा आदर केला आणि आत्मविश्वासाने तो लूक साकारला.” असं उत्तर आकांक्षाने टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.

“माझं या लूकबद्दल खूप कौतुक झालं आहे. पण मला असं वाटतं की जिथे कौतुक होतं, तिथे तोडंफार ट्रोलिंग होणारच. मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणं पसंत करते, माझं लक्ष सकारात्मकतेवर असतं”

-आकांक्षा पुरी

आकांक्षा आणि वाद यांचं नातं जुनं

आकांक्षा पुरी आणि वाद हे नातं जुनं आहे. कारण याआधीही तिच्यामुळे दोन वाद झाले होते ज्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलं होतं. २०२४ मध्ये आकांक्षा पुरीने धुळवडीच्या दिवशी टॉपलेस फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरुन नेटकरी चांगलेच संतापले होते. आकांक्षा पुरी तेव्हा एका मालिकेत पार्वतीची भूमिका साकारत होती. पार्वतीची भूमिका साकारत असूनही तुला असे फोटो काढून पोज द्यायला काहीच कसं वाटत नाही असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारला होता. मात्र त्यावेळी तिने ट्रोलर्सना काही उत्तर दिलं नव्हतं.

Akanksha Puri
२०२४ मध्ये आकांक्षा पुरीने टॉपलेस फोटो पोस्ट केले होते ज्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलं होतं. (फोटो–आकांक्षा पुरी, इन्साटाग्रम पेज)

बिग बॉसमधला तो लिपलॉक आणि पुन्हा एकदा आकांक्षा झाली ट्रोल

सलमान खानचा शो ‘बिग बॉस ओटीटी २’ २०२३ मध्ये चर्चेत आला होता. त्याचं कारण ठरली होती ती म्हणजे अभिनेत्री आकांक्षा पुरी आणि मॉडेल जैद हदीद यांचं किसिंग प्रकरण आहे. लाइव्ह शो दरम्यान या दोन्ही स्पर्धकांनी एकमेकांना किस केलं पण हे घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही मुळीच आवडलं नाही. लोक या दोघांवरही टीका करत होते. ‘वीकेंड का वार’च्या एपिसोडमध्ये आकांक्षा पुरी आणि जैद हदीद यांच्या कृतीवर सलमान खान संतापला. दोघेही हे आव्हान नाकारू शकले असते. पण त्यांनी नकार दिला नाही. कारण त्यांना किस करायचे होते, असं सलमान म्हणाला होता. या दोघांचा किसिंग सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळेही आकांक्षा पुरीला ट्रोल केलं गेलं होतं.

Akanksha Puri
अभिनेत्री आकांक्षा पुरीने २०२३ मध्ये काय स्पष्टीकरण दिलं होतं?

जैदला किस करणं फक्त टास्क होता असं आकांक्षा पुरी त्यावेळी म्हणाली होती. दरम्यान यावरुन आकांक्षाचा भाजपा नेत्यानेही समाचार घेतला होता आणि बिग बॉसवरही तेव्हा मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता हीच आकांक्षा पुरी पैठणी आणि त्यावरचा बिकिनी ब्लाऊज यामुळे चर्चेत आली असून तिच्यावर टीका केली जाते आहे.