Akansha Ranjan and Sharan Sharma tie the knot: कलाकार त्यांच्या कलाकृतींबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. सोशल मीडियावरील त्यांचे फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेत असतात. तसेच, त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांची झलकदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आकांक्षा रंजन व शरण शर्मा यांनी बांधली लग्नगाठ

लेखिका व अभिनेत्री आकांक्षा रंजन आणि दिग्दर्शक शरण शर्मा यांनी मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. ११ जुलैला हा विवाहसोहळा पार पडला. आकांक्षा व शरण यांच्या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, अथिया शेट्टी, मलायका अरोरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित होते.

लग्नानंतर आकांक्षाने लग्नातील खास फोटो शेअर करीत शरणसाठी भावूक पोस्ट लिहिली. तिने लिहिले, “तू नसशील, तर घर हे घर वाटत नाही आणि तू बरोबर असलास की, कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही.” लाल आणि सोनेरी रंगाच्या साडीत आकांक्षा अत्यंत सुंदर दिसत आहे. तिचा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे; तर शरणने पांढऱ्या रंगाचा पारंपरिक कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

फोटोंमध्ये त्यांच्या लग्नातील खास क्षण पाहायला मिळत आहे. कागदपत्रांवर सह्या करताना, तसेच ते एकमेकांना वचन देत असल्याचे पाहायला मिळते. एका फोटोमध्ये आकांक्षा भावूक झालेली दिसते.

आकांक्षाच्या या पोस्टवर अनेक कलाकार शुभेच्छांचा वर्षाव केला. आकांक्षाची खास मैत्रीण आलिया भट्टने कमेंट करीत प्रेम व्यक्त केले आहे. प्रकाश राज यांच्या पत्नीनेदेखील कमेंट करीत त्यांना आशीर्वाद दिले आहेत. त्याबरोबरच मलायका अरोरा, अथिया शेट्टी, अंशुला कपूर यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर आकांक्षा व शरण यांच्या लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आलिया भट्ट व रणबीर कपूर, करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, अनुष्का रंजन व आदित्य सील अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली होती.

आकांक्षा रंजन व शरण यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर आकांक्षा नुकतीच इक्का या सिनेमात दिसली होती. तर शरण शर्मा सध्या ‘कुकू की कुंडली’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात भुवन बाम, वामिका गब्बी, मनोज पाहवा, गीता अग्रवाल, सुविंदर पाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.