मराठी उद्योजक अक्षय वर्दे हे ‘ वर्देंची मोटरसायकल'(Vardenchi Motorcycles) या मॉडिफाईड बाईक ब्रँडचे संस्थापक आहेत. त्यांनी अभिनेत्री समीरा रेड्डीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याने २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुलेही आहेत. समीर रेड्डीसह अक्षय वर्देदेखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कुटुंब चाहत्यांच्या भेटीस येते. विविध फोटो, व्हिडीओ ते शेअर करत असतात. विशेष म्हणजे हे जोडपे मुंबईत राहत नाही, तर प्रसिद्धीझोतापासून दूर गोव्यात राहते.
समीरा सध्या चित्रपटांत काम करत नाही, तर ती आईपणा, बॉडी पॉझिटिव्हिटी, मानसिक आरोग्य यांबद्दल कंटेट बनवते. तर, अक्षय वर्दे हे त्यांचा व्यवसाय पुढे चालवत आहेत. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल खुलासा केला.
“हा माणूस माझ्याशी लग्न करणार नाही”
समीरा रेड्डी व अक्षय वर्दे यांनी नुकतीच ‘हॉटरफ्लाय’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत समीराने अक्षयबरोबर पहिली भेट कशी झाली होती याबद्दल खुलासा केला. समीरा म्हणाली, “तेज चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मला अक्षय दिसला होता. एक मोठी बाईक येताना दिसली. त्यावर अक्षय बसला होता.”
त्यावर अक्षय खुलासा करताना म्हणाला, “मला कोणीतरी सांगितलं की, ही अभिनेत्री समीरा रेड्डी आहे. तोपर्यंत मला असं वाटत होतं की, मी लारा दत्ताला भेटत आहे.”
समीराने असाही खुलासा केला की, जेव्हा तिने अक्षयला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ती प्रभावित झाली होती. जेव्हा प्रमोशनचे शूटिंग संपले तेव्हा अक्षयने तिला मोबाईल नंबर मागितला नाही. पण तिने स्वत: त्याला तिचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. पुढे समीरा म्हणाली, “मला संयम ठेवता येत नव्हता. मला वाटायचे की, हा माणूस माझ्याशी लग्न करणार नाही. मी या माणसाबरोबर माझा वेळ वाया घालवत आहे.”
“मी त्याच्याशी ब्रेकअप…”
त्यावर अक्षय म्हणाला, “ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या पलीकडे खरोखर माणूस म्हणून ती कशी आहे, हे समजून घेण्यासाठी मी वेळ घेतला. म्हणूनच मी घाई केली नाही.” पुढे समीराने आणखी एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “ते २०१३ चे वर्ष होते. माझा वाढदिवस जवळ आला होता. आम्ही तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होतो. माझ्या वाढदिवशी त्यानं काहीतरी खास प्लॅनिंग केलं पाहिजे, असं मला वाटतं होतं; पण तो तसे करताना दिसत नव्हता. त्यावेळी मी मनात विचार करत होते की, जर यानं काही प्लॅनिंग केलं नाही, तर मी त्याच्याशी ब्रेकअप करेन.”
ती पुढे म्हणाली, “मी खूप वाईन प्यायले होते. त्यानंतर मी स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतलं. मी खूप रडत होते. त्यावेळी मी ठरवलं होतं की, मी त्याच्याबरोबर ब्रेकअप करेन.” दुसरीकडे अक्षय मात्र तिला सरप्राईज देण्यासाठी प्लॅनिंग करीत होता. तो त्याच्या कुटुंबीयांसह तिला प्रपोज करण्यासाठी आला त्यावेळी समीराला धक्का बसला होता. जेव्हा अक्षयने प्रपोज केले, तेव्हाही ती रडत होती.
दरम्यान, अक्षय व समीराने २१ जानेवारी २०१४ रोजी लग्नगाठ बांधली. २०१५ मध्ये त्यांना मुलगा झाला आणि २०१९ ला त्यांना मुलगी झाली.
