Akshay Kumar Talks About Age Gap : एज गॅप रोमान्स हा बॉलीवूडमधील चर्चेत असणाऱ्या विषयांपैकी एक आहे. अनेक लोकप्रिय नायकांनी त्यांच्याहून कितीतरी वर्षांनी लहान असलेल्या नायिकांसह स्क्रीनवर रोमान्स केला आहे. अशातच आता पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे, याचं कारण आहे अक्षय कुमार.
अक्षय कुमार बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून तो नेहमी इंडस्ट्रीतील गोष्टींबद्दल मोकळेपणानं बोलत असतो. अशातच आता त्याला त्याच्यापेक्षा लहान अभिनेत्रीबरोबर चित्रपटात रोमान्स करण्याबद्दल विचारल्यानंतर त्यानं स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
अक्षय कुमार येत्या काळात ‘भूत बंगला’ या प्रियदर्शन यांच्या चित्रपटातून झळकणार आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. अक्षय कुमारबरोबर तिनं चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. दोघांमध्ये २६ वर्षांचं अंतर आहे. अक्षयचं वय ५८ आहे, तर वामिकाचं ३२ आहे. अशातच आता त्यानं मग अशा ऑनस्क्रीन जोडप्यांबद्दल आक्षेप घेण्यासारखं काय आहे असं म्हटलं आहे.
अक्षय कुमार काय म्हणाला?
‘न्यूज १८’शी संवाद साधताना अक्षय म्हणाला, “त्यात काय झालं? आपण आधी कधीच असं पाहिलं नाहीये का? हे हॉलीवूडमध्येही होत असतं. काहीवेळा ती चित्रपटाच्या कथेची गरज असते. किती तरी लोक त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या किंवा लहान असलेल्या लोकांशी लग्न करतात.”
अक्षय कुमार नंतर ‘भूत बंगला’ चित्रपटाचे दिग्दर्शक याबद्दल म्हणाले, “खरं वय आणि स्क्रीनवरचं वय यामध्ये फरक असतो. काहीवेळा स्क्रीनवर ज्या वयाचं पात्र कलाकार साकारत असतो, खऱ्या आयुष्यात त्याचं वय वेगळं असतं. पण, लोक त्यांचा स्वीकार करतात; मला त्यात काहीच समस्या वाटत नाही.”
अक्षय कुमार वामिकाबद्दल पुढे म्हणाला, “आम्ही भूत बंगलासाठी शूटिंग करत होतो तेव्हाच मी पहिल्यांदा वामिकाला भेटलो. ती खूप वेगळ्या प्रकारे काम करते. ती तिचे सीन वाचत असते आणि तालीम करत असते, ती खूप गांभीर्यानं काम करते.”
सलमान खाननंही ट्विंकल व काजोल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल खन्ना’ या शोमध्ये याबद्दल त्याचं मत मांडलं होतं. त्यावेळी त्यानं ‘सिकंदर’मध्ये रश्मिका मंदानाबरोबर काम करण्याबद्दल सांगितलेलं. समलान खान म्हणालेला, “अशी चर्चा होती की नायिकेत आणि माझ्यामध्ये ३१ वर्षांचं अंतर आहे. पण नायिकेला याचा काही त्रास नसेल, तिच्या वडिलांनाही त्याचा काही त्रास नसेल तर इतरांना यामुळे समस्या का व्हायला हव्या? तिला मुलगी झाल्यानंतर मी तिच्या मुलीबरोबरही काम करेन.”
दरम्यान, प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘भूत बंगला’ हा चित्रपट १० एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
