अमिताभ बच्चन व अक्षय कुमार दोघेही बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. दोघेही गेल्या अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत आणि आजही त्यांची क्रेझ कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या ‘हैवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेता सैफ अली खानही मुख्य भूमिकेत असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघांनी बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १८मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी एकमेकांचे अनेक किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशातच आता अक्षय कुमारनेही त्याचा व अमिताभ बच्चन यांचा एका जुना आणि गंमतीशीर किस्सा सांगितला आहे.
अक्षय कुमारने जेव्हा तो मुंबईतील लोखंडवाला येथे राहायचा तेव्हा एकदा अमिताभ बच्चन त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले असतानाचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी त्याच्या घरी काम करणाऱ्या त्याच्या एका मदतनीसकडून झालेल्या चुकीबद्दलही सांगत अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता किती होती याचा उल्लेख केला आहे.
अक्षय कुमारने सांगितला किस्सा
‘कौन बनेगा करोडपती’च्या सीझन १८मध्ये हैवानचे दिग्दर्शक प्रियदर्शनही सहभागी झाले होते. तर अक्षय कुमार आणि सैफ अली खान हॉट सीटवर बसले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांचे अनेक किस्से सांगितले. याचवेळी अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांना म्हणाला, “सर तुम्हाला आठवतंय का तुम्ही एकदा माझ्या घरी आलेलात. मी लोखंडवालाबद्दल बोलत आहे. जेव्हा मी तिथे राहायचो. माझ्या घरी जी व्यक्ती काम करायची त्यांना यांना पाणी द्यायचं होतं. पाणी देण्यासाठी तीन चार ग्लास होते आणि मला खूप चांगलं आठवत आहे की सरांनी कुर्ता घातला होता आणि तो जो मुलगा होता अल्लाहाबादचा होता आणि तो यांना पाहून चकीत झाला. त्याला विश्वास नाही बसला की तो अमिताभ बच्चन यांना एक ग्लास पाणी देत आहे.”
अक्षय कुमार याबद्दल पुढे म्हणाला, “तो पाणी घेऊन आला आणि चार ग्लासमध्ये पाणी होतं आणि त्या चारही ग्लासमधील पाणी त्याने यांच्या कुर्त्यावर सांडवलं. कारण त्याला विश्वासच बसला नाही. तो पाहूच शकला नाही. मी हा विचार करत होतो की हे काय झालं. सर खूप उंच आहेत मला सरांना माझा कुर्ता द्यावा लागला कारण तो त्यांना शर्टच्या आकाराचा वाटेल. मला आता त्याचं नाव आठवत नाहीये. यावर बिग बी, सैफ अली खान आणि प्रियदर्शन सगळे जण हसायला लागले”.
