बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे. २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्त अक्षयने त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' या चित्रपटाची घोषणा केलेली आहे. आपल्या देशाच्या पहिल्या एयर स्ट्राइक म्हणजेच हवाई हल्ल्याची कहाणी अक्षय कुमार चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणणार आहे. अक्षयने या चित्रपटाचा एक छोटासा प्रोमोदेखील शेयर केला आहे. तो शेअर करताना अक्षय लिहितो, "आज गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त सारा देश जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानच्या घोषणा देत आहे. आमच्या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी याहून उत्तम दिवस मिळणार नाही. आपल्या भारताच्या पहिल्या हवाई हल्ल्याची रोमांचक कहाणी." आणखी वाचा : Tejas Teaser : "भारत को छेडोगे तो…" कंगना रणौतच्या बहुचर्चित 'तेजस'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित आजपासून बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच २ ऑक्टोबर २०२४ याच दिवशी 'स्काय फोर्स' प्रदर्शित होणार आहे. या टीझरमध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद अयुब खान यांचं भाषण ऐकायला मिळत आहे आणि यापाठोपाठच भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या भाषणाची एक क्लिप आपल्यासमोर येते. या भाषणात शास्त्रीजी यांना हत्यारांना उत्तर हत्यारांनीच दिलं जाईल असं म्हणताना दिसत आहेत. अक्षय कुमार यात प्रमुख भूमिकेत असणार आहे तर या चित्रपटातून वीर पहाडिया सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. उद्योगपति संजय पहाडिया यांचा मुलगा वीरचं नाव सारा अली खानबरोबर जोडण्यात आलं आहे. तर त्याचा भाऊ शिखर पहाडिया हा जान्हवी कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आपण ऐकल्या आहेत. याबरोबरच अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपटही येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.