अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘भूत बंगला’ १० एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. आपण आतापर्यंत भूतांच्या गोष्टी असलेले अनेक चित्रपट पाहिले आहेत. अनेक कलाकार त्यांचे अनुभव सांगत असतात. आता अक्षय कुमारने त्याच्या घरात घडलेल्या एका प्रसंग सांगितला आहे. त्या घरात ट्विंकल खन्ना व तिचा मुलगा आरव यांना विचित्र अनुभव आले होते.

अक्षय कुमार इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “आम्ही एका घरात राहायचो, तिथे काहीतरी गडबड आहे, असं माझी पत्नी ट्विंकल मला सांगायची. त्यावेळी माझा मुलगा आरव ४-५ वर्षांचा होता.” अक्षयने सांगितलं की, जेव्हा तो जुहू येथे एका घरात पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगा आरवबरोबर राहत होता, तिथे ट्विंकलला सतत कोणाचे तरी अस्तित्व जाणवायचे. अक्षय म्हणाला, “मी ट्विंकलला म्हणायचो की तू सुशिक्षित असूनही अशा गोष्टींवर विश्वास कशी ठेवतेस. पण ती म्हणायची की तिला घरात महिला चालतेय, असा आवाज ऐकू यायचा.”

आरवबरोबर घडलेला तो प्रसंग

अक्षयच्या आयुष्यात एक धक्कादायक प्रसंग घडला होता. कारण त्याने आरवला कुणाशी तरी बोलताना पाहिलं होतं. “एक दिवस माझा ४-५ वर्षांचा मुलगा आरव झोपला होता, अचानक तो एका बाजूला इशारा करून म्हणाला, ‘तू इथे राहू नकोस, निघून जा इथून!’ मी त्याला विचारलं की तू कोणाशी बोलतोयस? तेव्हा मी पूर्णपणे हादरून गेलो होतो. ट्विंकल मला लगेच म्हणाली, बघ मी तुला सांगत होते ना, इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता आरवही कुणाशी तरी बोलतोय,” असं अक्षय कुमारने सांगितलं.

निगेटिव्ह एनर्जीबद्दल अक्षय कुमार म्हणाला..

अक्षय कुमारने हा प्रसंग सांगितल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेमुळे मनात संशय होता. त्यादिवशी भूत असतात, या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला. तसेच नकारात्मक एनर्जीही असते, असं त्याने सांगितलं. “त्या दिवशी मला जाणवलं की जगात नक्कीच काहीतरी ‘नेगेटिव्ह एनर्जी’ किंवा अलौकिक शक्ती असते. लोक म्हणतात ना की काहींच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी असते, तसेच काही लोक निगेटिव्ह एनर्जीला आकर्षित करतात. आपल्या आजूबाजूला नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारची एनर्जी असते. तीच एनर्जी माझ्या घरात होती,” असं अक्षय कुमारने नमूद केलं.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट

अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी तब्बल १६ वर्षांनंतर या ‘भूत बंगला’ चित्रपटासाठी एकत्र आली आहे. याआधी त्यांनी ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’ आणि ‘गरम मसाला’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या नवीन चित्रपटात अक्षयबरोबर परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.