Bhoot Bungla box office collection day 3: अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा सिनेमा १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह तब्बू,मिथिला पालकर, असरानी, राजपाल यादव, परेश रावल, वामिका गब्बी, राजेश शर्मा, मिथून चक्रवर्ती हे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
काही दिवसांपासून रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर : द रिव्हेंज’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटगृहांमध्ये या सिनेमाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली.
तसेच, दरम्यानच्या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना या सिनेमाच्या तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, भूत बंगला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चित्र बदलल्याचे दिसले. भूत बंगला सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, ‘धुरंधर २’चे चित्रपटगृहांतील वर्चस्व कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ सिनेमाने तिसऱ्या दिवशी किती कोटींची केली कमाई?
आता तीन दिवसांत भूत बंगला या सिनेमाने किती कमाई केली, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला, हे जाणून घेऊ…
प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या रविवारी अक्षय कुमारच्या या सिनेमाचे भारतात ११,६८२ शो होते. सॅल्कनिकनुसार, या सिनेमाने तिसऱ्या दिवशी २३ कोटींची कमाई केली. त्यासह सिनेमाचे तीन दिवसांचे कलेक्शन ५८ कोटी इतके झाले आहे. तर जगभरात भूत बंगला सिनेमाने ९५.८७ कोटींची कमाई केली आहे.
भूत बंगला सिनेमाने पहिल्या दिवशी १२.२५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी १९ कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी सिनेमाने २३ कोटींची कमाई केली.
प्रियदर्शन व अक्षय कुमार यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने १६ वर्षांनी एकत्र काम केले. याआधी त्यांनी खट्टा मीठा या सिनेमात एकत्र काम केले होते. हा सिनेमा २०१० ला प्रदर्शित झाला होता. तब्बू व अक्षय कुमारने २५ वर्षांनी स्क्रीन शेअर केली आहे. तसेच, चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेले असरानी यांचे गेल्या वर्षी निधन झाले.
प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तरीही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
