Akshay Kumar’s Bhoot Bungla Postpone : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळच घातला नाहीय, तर आता या चित्रपटामुळे इतर मोठ्या चित्रपटांवरही परिणाम होत आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’मुळे इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम होताना दिसत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित हा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये तुफान चालत असल्याने, अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख एक आठवड्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

‘भूत बंगला’ आता कधी प्रदर्शित होणार?

‘भूत बंगला’ हा चित्रपट आधी १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून सुरू होतील. त्यानंतर १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. चित्रपटाची निर्माती एकता कपूरने सोशल मीडियावर याबाबत माहिती शेअर केली आहे.

Award Banner

सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “आम्ही ‘भूत बंगला’चे प्रदर्शन एक आठवड्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाचा उत्तम अनुभव घ्यावा आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळावा, हाच आमचा उद्देश आहे.” पुढे या पोस्टमध्ये ‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपटाच्या यशाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

“‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत आहे, जी चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता, दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचे पूर्ण लक्ष मिळावे आणि थिएटरमध्ये पुरेशी जागा मिळावी, यासाठी हा बदल करणे सर्वांच्याच फायद्याचे आहे,” असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

‘धुरंधर २’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई

‘धुरंधर: द रिव्हेंज’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पेड प्रीव्ह्यूजसह तब्बल १४५ कोटी रुपयांची कमाई करत धमाकेदार सुरुवात केली. त्यानंतरही या चित्रपटाची कमाई सातत्याने वाढत आहे. अवघ्या १४ दिवसांत या चित्रपटाने भारतात ९२० कोटी रुपयांहून अधिक आणि जगभरात १४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘कलकी २८९८ एडी’, ‘आरआरआर’ आणि ‘पुष्पा’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’बद्दल थोडक्यात

‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही जोडी तब्बल १७ वर्षांनंतर एकत्र येत आहे. याआधी त्यांनी ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’ आणि ‘गरम मसाला’ यांसारखे सुपरहीट विनोदी चित्रपट दिले आहेत. ‘भूत बंगला’ चित्रपटात वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू, राजपाल यादव आणि मिथिला पालकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमार आणि एकता कपूर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आता १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होईल, तर १६ एप्रिलला रात्री ९ वाजल्यापासून याचे विशेष शो (पेड प्रिव्ह्यू) सुरू होतींल.