Akshay Kumar Birthday Special Fitness Diet Routine: सेटवर वेळेत येणं, ठरलेल्या वेळेत घरी जाणं, सगळे स्टंट स्वत: परफॉर्म करणं…एकंदर बॉलीवूडचा ‘मोस्ट डिसिप्लिन’ स्टार म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. कॉमेडी भूमिका असो किंवा अॅक्शनपट खिलाडी कुमारने नेहमीच त्याच्या हटके शैलीने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. बॉलीवूडच्या या सुपरस्टारचा आज ५९ वा वाढदिवस आहे. महत्त्वाचं म्हणजे या वयातही अक्षयचा फिटनेस अलीकडच्या तरुणाईला लाजवेल असा आहे. ५९ वर्षांचा हा खिलाडी कुमार दररोज किती तास काम करतो? स्वत:चा फिटनेस कसा जपतो, आरोग्य आणि डाएटची काळजी कशी घेतो? याविषयी आपण जाणून घेऊयात…
प्रोटीन पावडर, सप्लिमेंट्स किंवा मील-रिप्लेसमेंट शेक्सचं सेवन करणं पूर्णपणे टाळा, त्याऐवजी संतुलित आहार घ्या असा सल्ला अक्षय कुमार सर्वांना देतो. त्याने रणवीर अलाहाबादियाशी संवाद साधताना त्याच्या दिनचर्येविषयी सांगितलं होतं. निरोगी राहायचं असेल तर, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या पोटाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत रात्रीचं जेवण जेवा. ज्यामुळे अन्न पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
अक्षय म्हणाला सांगतो, “या सगळ्या माझ्या बालपणापासूनच्या सवयी आहेत. रात्री लवकर वेळेत झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं ही शिकवण माझ्या घरच्यांची होती आणि हीच सवय मी आजपर्यंत फॉलो करतोय. पार्ट्या वगैरे करायला मी कधीच नाही म्हणत नाही. अगदी मी सुद्धा अनेकदा पार्ट्यांना गेलो आहे पण, एका क्षणानंतर मला घरी येऊन कधी एकदा विश्रांती घेतोय असं वाटतं.”
अक्षयचा दिवस पहाटे ४-४:३० वाजता सुरू होतो आणि रात्री ९:३० वाजता तो विश्रांती घेतो. अभिनेता म्हणतो, “मी दिवसाचे ८ तास काम करतो…आठ तासांनंतर तुमचं शरीर थकतं. दिवसातील २४ तासांपैकी २ तास तरी व्यायाम करणं आवश्यक आहे. मी जे ८ तास सेटवर काम करतो तेव्हा मी अजिबात व्हॅनिटीमध्ये बसून राहत नाही. सतत सेटवर हजर असतो…कामाच्या ८ तासात मी फक्त वॉशरूम वापरण्यासाठी व्हॅनिटीमध्ये जातो.”
‘युवर बॉडी ऑलरेडी नोज’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अक्षयने रात्री लवकर जेवणं का महत्त्वाचं आहे, याचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. अभिनेता स्वत: रात्रीचं जेवण सायंकाळी ६:३० वाजता जेवतो. साडेसहा वाजता जेवल्यावर नऊ ते साडेनऊ पर्यंत तुम्ही विश्रांती घेऊ शकता. असं त्याने सांगितलं.
“रविवारी रात्री जेवल्यावर मी सोमवारी काहीच खात नाही…माझा पूर्ण दिवस उपवास असतो. थेट मंगळवारी सकाळी पोटभर नाश्ता करतो. सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की, सायंकाळी साडेसहानंतर कोणतेही जड पदार्थ खाणं टाळा. मला अचानक भूक लागल्यावर मी हलकेफुलके पदार्थ खातो जसे की, अंडी, गाजर, मुळा, सूप किंवा सॅलड”
अक्षयला सात्विक पदार्थ खायला आवडतात. जेवणात मसाले नसतात, कांदा व लसूणचा सुद्धा समावेश नसतो. अशी माहिती अभिनेत्याच्या पोषणतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. याशिवाय प्रत्येक ३ महिन्यांनी अक्षय कुमार ७ दिवसांचा ब्रेक घेतोच.
