Akshay Kumar Career: बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सध्या एका कठीण टप्प्यातून जात आहे. २०२३ मधील ‘ओह माय गॉड २’ नंतर त्याचे एकापाठोपाठ एक ८ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ पासून ते रिमेक असलेल्या ‘सरफिरा’पर्यंत, प्रेक्षकांनी अक्षयच्या चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकाच साच्यातील भूमिका आणि चित्रपटांची घसरलेली गुणवत्ता मानली जात आहे.

अभिनेता अक्षय कुमारची गणना बॉलीवूडमधील आघाडीच्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये केली जाते, पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे नशीब त्याला फारशी साथ देत नाहीये. २०२३ मध्ये त्याचा ‘ओह माय गॉड २’ हा शेवटचा हिट चित्रपट आला होता. त्यानंतर गेल्या ३ वर्षांत त्याचे ८ चित्रपट प्रदर्शित झाले, पण त्यापैकी बहुतांश चित्रपट सरासरी किंवा फ्लॉप ठरले. अक्षय कुमारचे चित्रपट सतत फ्लॉप का होत आहेत आणि ‘भूत बंगला’ मुळे तो पुन्हा कमबॅक करू शकेल का, याबद्दल थोडं समजून घेऊयात.

चित्रपट फ्लॉप ठरण्याची कारणं?

अक्षय कुमारने या तीन वर्षांत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट केले, पण प्रेक्षकांना ते फारसे आवडले नाहीत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘हाऊसफुल ५’, ‘सरफिरा’ किंवा ‘मिशन राणीगंज’ असो- यापैकी कोणत्याही चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

  • हाऊसफुल ५: या चित्रपटात पुन्हा तेच जुने विनोद आणि कमकुवत कथा असल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
  • सरफिरा: हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या ‘सोरारई पोटरू’ या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक होता. ही कथा प्रेक्षकांनी आधीच पाहिलेली असल्याने त्यांना यात काही नवीन वाटलं नाही. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आदळला.
  • मिशन राणीगंज: हा चित्रपट एका प्रेरणादायी कथेवर आधारित होता, पण ती कथा लोकांपर्यंत तितक्या प्रभावीपणे पोहोचू शकली नाही. तसेच या चित्रपटाचे प्रमोशनही खूप कमी पडले.

जास्त चित्रपट आणि कमी गुणवत्ता

अक्षय कुमारच्या अपयशाचं एक मोठं कारण म्हणजे तो खूप जास्त चित्रपट करतोय. कमी वेळेत जास्तीत जास्त चित्रपट करण्याच्या नादात अक्षय कुमार चित्रपटांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करतोय, परिणामी त्याच्या चित्रपटांचा आकडा वाढत गेला. दुसरीकडे, शाहरुख खान, रणवीर सिंहसारखे स्टार्स ब्रेक घेऊन दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शाहरुख खानने कामातून काही काळ ब्रेक घेऊन ‘पठाण’ सारख्या चित्रपटावर लक्ष केंद्रित केले, प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि त्याने दमदार कमबॅक केलं. हेच रणवीर सिंहच्या धुरंधरच्या बाबतीतही झालं.

‘भूत बंगला’ अक्षय कुमारसाठी गेम चेंजर ठरणार का?

‘भूत बंगला’ हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहेत. प्रियदर्शन आणि अक्षय कुमार या जोडीने यापूर्वी ‘भूल भुलैया’ सारखा सुपरहिट चित्रपट दिला आहे. या जुन्या आठवणी आणि जोडीची लोकप्रियता चित्रपटाच्या फायद्याची ठरू शकते. या चित्रपटाबद्दल आतापासूनच चर्चा सुरू असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.

कथानकच ठरवणार सिनेमाचं यश-अपयश

सध्याच्या काळात प्रेक्षक केवळ स्टार बघून चित्रपट पाहत नाहीत, तर त्यांना दमदार कथा पाहिजे असते. जर चित्रपटाची कथा दमदार असेल आणि लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, तरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकू शकेल.

‘भूत बंगला’ अक्षय कुमारसाठी केवळ एक नवीन चित्रपट नसून, प्रेक्षकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची मोठी संधी आहे. जर त्याला पुन्हा यशाची चव चाखायची असेल तर या चित्रपटाद्वारे त्याला प्रेक्षकांची मनं जिंकावी लागेल.