Akshay Kumar Fitness Routine and strict diet plan : बॉलीवूडचा ‘फिटनेस आयकॉन’ अक्षय कुमार वयाच्या ५८ व्या वर्षीही नवतरुणांना लाजवेल इतका फिट आणि चपळ आहे. मार्शल आर्ट्स एक्सपर्ट असलेला अक्षय कोणतीही कृत्रिम सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर न घेता केवळ घरगुती सकस आहारावर स्वतःला तंदुरुस्त ठेवतो. नुकतेच त्याच्या फिटनेस दिनचर्येतील काही रंजक नियम समोर आले आहेत, ज्यामध्ये त्याचा ‘८-८-८ चा नियम’ आणि आठवड्यातून एकदा पाळला जाणारा कडक उपवास अत्यंत महत्त्वाचा आहे. लहानपणापासून उगवता सूर्य न पाहिलेला एकही दिवस गेला नाही, असे सांगणाऱ्या अक्षयचे सकाळचे रुटीन आणि डाएट प्लॅन चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.
अक्षय कुमारला व्यवस्थित दिनचर्येसाठी ७ ते ८ तासांची पुरेशी झोप आवश्यक असते. त्याच्यामते, रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे. यामुळे शरीराला नवा उत्साह मिळतो आणि दिवसभरात स्वतःसाठी भरपूर वेळही मिळतो. अक्षयने एकदा गमतीत सांगितलं होतं की, लहानपणापासून आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा त्याने उगवता सूर्य पाहिला नसेल. तो नेहमी सूर्योदयापूर्वी उठतो. तो रात्री साधारण ९ ते ९:३० वाजता झोपतो आणि पहाटे ४ वाजता उठतो. तो उठल्यानंतर सकाळीच सगळी कामं आटोपतो, त्यामुळे त्याच्याकडे दिवसभर भरपूर वेळ असतो.
अक्षय कुमारचा ८-८-८ चा नियम
अक्षय कुमारच्या मते, आपल्याला २४ तास मिळतात. त्यात आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो. त्यासाठी तो एका नियमाचे पालन करतो. निरोगी पद्धतीने जगण्यासाठी ‘८ तासांचा नियम’ पाळला पाहिजे, असं त्याला वाटतं. यामध्ये दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक ८-८ तासांच्या तीन भागांत विभागलं जातं. अक्षय हा केवळ आपल्या कामालाच नाही, तर आपल्या कुटुंबालाही तितकेच प्राधान्य देतो. तसेच झोपही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
अक्षयचे सकाळचे वेळापत्रक
अक्षय कुमारच्या सकाळच्या रुटीनमध्ये मार्शल आर्ट्स, योग, पोहणे आणि धावणे या गोष्टींचा समावेश असतो. तो रात्रीच्या पार्ट्यांमध्ये कधीही जात नाही. शरीराची ताकद वाढवण्यासाठी तो क्लाइंबिंग आणि लटकणे यांसारखे व्यायाम करतो. तो एखाद्या बॉडीबिल्डरसारखा नाही, तर ‘ॲथलीट’सारखा सराव करतो. ‘मेन्स एक्सपी’च्या रिपोर्टनुसार, स्वतःला मजबूत आणि चपळ ठेवण्यासाठी अक्षय वजन उचलण्याऐवजी बॉडीवेट व्यायाम आणि मैदानी खेळांना प्राधान्य देतो. शारीरिक व्यायामाइतकाच मानसिक व्यायामही महत्त्वाचा आहे, यासाठी नियमित योग आणि ध्यान करतो.
अक्षय कुमारचा डाएट
अक्षय कुमार आपल्या डाएटची खूप काळजी घेतो आणि आठवड्यातून एकदा उपवास करतो. तो रविवारी रात्री जेवल्यानंतर थेट मंगळवारी सकाळी जेवतो. म्हणजेच, तो सोमवारी दिवसभर काहीही खात नाही. यामुळे त्याच्या पोटाला आराम मिळतो. ५३ व्या वर्षी अक्षय पूर्णपणे व्हिगन झाला. त्यामुळे त्याच्या आहारात प्रामुख्याने फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असतो. अक्षयच्या मते, शाकाहारातून प्रोटीन मोठ्या प्रमाणात मिळतं.
अक्षय कुमार प्रोसेस्ड फूड, कृत्रिम सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडर कधीच घेत नाही. तो घरचं जेवण जेवणं पसंत करतो. अक्षय कुमारच्या तंदुरुस्तीचे आणखी एक महत्त्वाचे रहस्य म्हणजे भरपूर पाणी पिणे. शरीरातील विषारी घटक बाहेर पडावे, यासाठी अक्षय भरपूर पाणी पितो.
