बॉलीवूडचा ‘मोस्ट डिसिप्लिन’ स्टार म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. पहाटे सूर्योदयापूर्वी उठणं, वेळेत सेटवर हजर राहायचं, आपलं काम व्यवस्थित पूर्ण करून रात्री लवकर झोपायचं आणि याचबरोबर आपल्या कुटुंबाला वेळ देणं या सगळ्या गोष्टी अक्षय कुमारच्या दिनचर्येचा भाग आहेत. अलीकडच्या काळात अनेक लोक आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे वयाच्या ५८ व्या वर्षी कमालीचा फिटनेस जपणारा अक्षय कुमार सर्वांसाठीच आदर्श आहे. अभिनेता त्याच्या आरोग्याची काळजी कशी घेतो? त्याचं डाएट काय असतं? याशिवाय अभिनेता किती तास काम करतो? थोडक्यात जाणून घेऊयात…

अक्षय कुमारने त्याच्या दिनचर्येविषयी रणवीर अलाहाबादियाशी संवाद साधताना खुलासा केला होता. अक्षय म्हणाला होता, “या सगळ्या माझ्या बालपणापासूनच्या सवयी आहेत. रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं अशी शिकवण माझ्या घरच्यांची होती आणि हीच सवय मी आजपर्यंत फॉलो करतोय. पार्ट्या वगैरे करायला मी कधीच नाही म्हणत नाही. अगदी मी सुद्धा अनेकदा पार्ट्यांना गेलो आहे पण, एका क्षणानंतर मला घरी येऊन कधी एकदा विश्रांती घेतोय असं होतं.”

“माझा दिवस पहाटे ४-४:३० वाजता सुरू होतो आणि मी रात्री ९:३० वाजता झोपतो. मला पहाटेची वेळ खूप महत्त्वाची वाटते कारण…तेव्हा मला स्वत:साठी मोकळा वेळ मिळतो. घरचे सगळे विश्रांती घेत असतात त्यामुळे शांत वातावरण असतं. मी दिवसाचे ८ तास काम करतो…आठ तासांनंतर तुमचं शरीर थकतं. दिवसातील २४ तासांपैकी २ तास तरी व्यायाम करणं आवश्यक आहे. मी जे ८ तास सेटवर काम करतो तेव्हा मी अजिबात व्हॅनिटीमध्ये बसून राहत नाही. सतत सेटवर हजर असतो…कामाच्या ८ तासात मी फक्त वॉशरूम वापरण्यासाठी व्हॅनिटीमध्ये जातो.”

‘युवर बॉडी ऑलरेडी नोज’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अक्षयने रात्री वेळेत लवकर जेवावं याचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. अभिनेता स्वत: रात्रीचं जेवण सायंकाळी ६:३० वाजता जेवतो. साडेसहा वाजता जेवल्यावर नऊ ते साडेनऊ पर्यंत तुम्ही विश्रांती घेऊ शकता. असं त्याने सांगितलं.

“रविवारी रात्री जेवल्यावर मी सोमवारी काहीच खात नाही…माझा पूर्ण दिवस उपवास असतो. थेट मंगळवारी सकाळी पोटभर नाश्ता करतो. सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की, सायंकाळी साडेसहानंतर कोणतेही जड पदार्थ खाणं टाळा. मला अचानक भूक लागल्यावर मी हलकेफुलके पदार्थ खातो जसे की, अंडी, गाजर, मुळा, सूप किंवा सॅलड”

अक्षयचे पोषणतज्ज्ञ सांगतात, अक्षयला सात्विक पदार्थ खायला आवडतात. जेवणात मसाले नसतात, कांदा व लसूणचा सुद्धा समावेश नसतो. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार ‘ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आला होता. यावेळी त्याने वर्षातून १२५ सुट्ट्या घेत असल्याचं सांगितलं होतं. “मी वर्षातून १२५ सुट्ट्या घेतो…यात ५२ रविवार, ४० दिवस उन्हाळी सुट्ट्या, १२ दिवस ख्रिसमस व्हेकेशन आणि दिवाळीत सलग ३ दिवस सुट्ट्या घेतो. याशिवाय प्रत्येक ३ महिन्यांनी ७ दिवसांचा ब्रेक घेतो” असं अक्षयने सांगितलं होतं.