अक्षय कुमार आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच सतर्क असतो. न चुकता व्यायाम करणं, वेळेत जेवणं, आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांपासून दूर राहणं या त्याच्या अनेक वर्षांपासूनच्या सवयी आहेत. अक्षय त्याच्या सहकलाकारांना देखील काळजीपोटी अनेकदा आरोग्याचं, फिटनेसचं महत्त्व समजावून सांगतो. याबाबत अभिनेते सौरभ शुक्ला यांनी खुलासा केला आहे.

सौरभ शुक्ला सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “अक्षय कुमार पाजी आरोग्याबाबत खूपच जागरूक आहेत. ते दररोज न चुकता व्यायाम करतात आणि दुसऱ्याला सुद्धा आरोग्याच्या बाबतीत तेवढंच सतर्क राहायला सांगतात. जसं की, त्यांनी मला सुद्धा सांगितलं होतं… तुम्ही जरा व्यायाम वगैरे करत जा. चांगले अभिनेते आहात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं माफ आहे, दररोज व्यायाम केलाच पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या, नीट राहा असे ते कायम मला सल्ला देतात. मुळात त्यांच्या स्वभाव खूप चांगला आहे, पाजी सर्वांची काळजी करतात.”

“अक्षय कुमारचं जेवण फार लिमिटेड आणि व्यवस्थित असतं. मर्यादीत आहार ( Limited Eating ) कडे त्यांचा कल आहे, आणि मुळात त्यांचं जेवण एकदम ‘देसी’ असतं… असं काही स्पेशल डाएट वगैरे नाहीये. पण, जेव्हा कधी अक्षय पाजी जेवणासाठी ब्रेक घेतात…त्यांच्याबरोबर कमीत कमी १० ते १२ लोक एकत्र जेवायला बसतात. त्यांना असं एकट्याला जेवायला आवडत नाही. सगळ्यांबरोबर मिळून मिसळून ते जेवतात. खरंच एकत्र जेवताना फार मजा येते…हीच खरी आपली भारतीय संस्कृती आहे.” असं सौरभ शुक्ला यांनी सांगितलं.

याशिवाय ‘फिल्मी अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत सौरभ शुक्ला म्हणाले, “मला अक्षय कुमार पाजींनी फोन केला ते म्हणाले, मला काहीच माहिती नाही…काहीही झालं तरी आज तुम्ही माझ्या जिममध्ये यायचंय. त्यानंतर, मी गेलो त्यांच्या जिममध्ये…पुढे ४ तास त्यांनी माझ्याकडून व्यायाम करून घेतला. त्यांना सर्वांची काळजी असते. त्यांचं इतकंच म्हणणं होतं की, तुम्ही चांगले कलाकार आहात, तुमचं काम उत्तम आहे सगळं मान्य आहे पण, तुम्ही आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे.”

आहारतज्ज्ञ गरिमा गोयल याविषयी सांगतात, “अक्षय कुमारची ‘लिमिटेड Eating’ ही सवय खूपच चांगली आहे. खाण्याचं प्रमाण नियंत्रित केल्यामुळे अनेक फायदे होतात. शरीराला नेमकी आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. यामुळे अनावश्यक चरबी साठत नाही. इन्सुलिनची वाढलेली पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, याशिवाय दीर्घकाळ वजन स्थिर राहण्यास देखील मदत होते. याचबरोबर तुम्ही मित्रमंडळींबरोबर एकत्र बसून जेवता…तेव्हा तुम्ही सावकाश खाता. यामुळे भावनिक समाधानही मिळतं.”