Akshay Kumar Reveals Hera Pheri 3 Is Currently On Hold : ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. कधी तो परेश रावल यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे चर्चेत आला, तर कधी तो कॉपीराईट्सच्या वादामुळे चर्चेत आला. त्यामुळे ‘हेरा फेरी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याचे उत्तर अजूनही नाही.
अशातच चित्रपटातला मुख्य अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. अभिनेता सध्या त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच एका मुलाखतीत त्याला ‘हेरा फेरी ३’बद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने महत्त्वाची माहिती दिली. जी ऐकून प्रेक्षक नक्कीच नाराज होऊ शकतात.
“दुर्दैवाने, ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचे काम सध्या थांबलेले आहे” – अक्षय कुमार
शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अक्षय कुमारने ‘हेरा फेरी ३’ बाबत स्पष्टीकरण दिले. अक्षय म्हणाला, “दुर्दैवाने, या चित्रपटाचे काम सध्या थांबलेले आहे. ‘हेरा फेरी ३’ सध्या तरी बनत नाहीये.” जेव्हा सूत्रसंचालक शुभंकरने यावर आश्चर्य व्यक्त केले, तेव्हा अक्षय म्हणाला, “मला स्वतःलाही याचा धक्का बसला होता. पण ठीक आहे. काही हरकत नाही. आम्ही ‘वेलकम’ बनवला आहे. आता सगळं नीट होण्यासाठी काहीतरी चमत्कारच व्हावा लागेल.”
“पुढचे एक वर्ष ‘हेरा फेरी ३’ चित्रपट येण्याची शक्यता नाही” – अक्षय कुमार
यापुढे तो म्हणाला, “पुढचे एक वर्ष तरी हा चित्रपट येण्याची शक्यता नाही. यामध्ये अनेक तांत्रिक समस्या आहेत. याचा अर्थ असा नाही की, आम्ही तिघे (अक्षय, सुनील, परेश) सोबत नाही आहोत. आम्ही एकत्रच आहोत. पण काही गोष्टी अशा असतात, ज्या मी कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही. अनेक कायदेशीर करार आणि तडजोडी असतात. ज्यामुळे एखादा प्रोजेक्ट पुढे ढकलला जातो.”
दरम्यान, प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘हेरा फेरी’ चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे, राजू आणि श्याम या विनोदी भूमिकांमधून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. जबरदस्त संवाद आणि विनोदी शैलीमुळे हा चित्रपट सुपरहीट ठरला. त्यानंतर २००६ मध्ये नीरज वोरा यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फिर हेरा फेरी’ आला. त्यानंतर ‘हेरा फेरी ३’ येणार असल्याचे जाहीर झाले, ज्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. पण आता हा चित्रपट वर्षभर तरी येण्याची शक्यता नाही, असे अक्षयने सांगितले आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांचा नक्कीच हिरमोड झाला आहे.
