Chinni Prakash on Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमार हा सतत कोणत्या ना कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. काही दिवसांपूर्वी त्याची व अर्शद वारसीची प्रमुख भूमिका असलेला जॉली एलएलबी ३ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
अभिनाबरोबरच अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेस, शिस्तबद्ध दिनचर्या आणि त्याची काम करण्याची पद्धत यांसाठी ओळखला जातो. त्याच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार त्याच्याबद्दल अनेकदा बोलतात, आठवणी सांगतात.
“त्या २०-२५ गाण्यांमध्ये त्याने कधीही…”
आता लोकप्रिय कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी नुकतीच ‘फ्रायडे टॉकीज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत चिन्नी प्रकाश यांनी अक्षय कुमारबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, “अक्षय हा खूप प्रामाणिक मुलगा आहे. तो कामात त्याचे १०० टक्के देतो. मी त्याच्याबरोबर २० ते २५ गाणी शूट केली आहे. त्या २०-२५ गाण्यांमध्ये त्याने कधीही कोणतीही स्टेप बदलण्यास सांगितलेलं नाही. खिलाडी या चित्रपटाच्या एका गाण्यात आम्ही अक्षयला १०० अंडी मारली होती. सीन असा होता की, मुली अक्षयला अंडी फेकून मारतात.”
“जेव्हा अंडी मारली जातात तेव्हा वेदना होतात. इतकेच नाही, तर त्याचा वासही खूप येतो. तो वास बराच वेळ येतो. इतकं सर्व असूनही अक्षय त्याबद्दल काहीच बोलला नाही किंवा तक्रार केली नाही. तो खूप मेहनती आहे. त्याच्यात कोणताही अहंकार नाही. त्याच्यात साधेपणा आहे. मी त्याच्याइतका मेहनती अभिनेता कधीही पाहिला नाही आणि तो कामाप्रति खूप समर्पित आहे.”
चिन्नी प्रकाश यांनी हाऊसफुल या चित्रपटाच्या सर्व भागांमध्ये चिन्नी प्रकाश यांनी अक्षय कुमारबरोबर काम केले आहे. हाऊसफुल ५ मध्येदेखील त्यांनी एकत्र काम केले आहे. इतक्या वर्षांत अक्षयमध्ये काहीही बदल झाला नसल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, “२० वर्षांनंतरही त्याचा दृष्टिकोन तसाच आहे. मी नुकताच त्याच्याबरोबर ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात काम केले आणि आजही तो त्याच्या कामाप्रति तसेच समर्पण दाखवतो. तो तुमच्यासाठी काहीही करू शकतो. तुम्ही त्याला १० व्या मजल्यावरून उडी मारण्यास सांगा आणि तो तेसुद्धा करेल.”
१९९४ साली प्रदर्शित झालेल्या मोहरा या चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगबद्दल सांगितले. चिन्नी प्रकाश म्हणाले, “जेव्हा मी गाणे ऐकले, तेव्हा मला ती गझल वाटलेली. पण, अक्षय म्हणाला की हे गाणे हिट होईल. कोणाच्याही तारखा जुळत नव्हत्या. त्यामुळे आम्ही हे गाणे रात्रीच शूट केले होते.”
दरम्यान, अक्षय कुमार आता आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
