बॉलीवूडमध्ये अनेकदा दाक्षिणात्य आणि इतर प्रादेशिक भाषांतील हिट ठरलेल्या चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले जातात. अशा अनेक रिमेकमध्ये बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार झळकला आहे. आता पुन्हा एकदा तो आणखी एका दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असून, या चित्रपटाचं नाव ‘हैवान’ आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अक्षय कुमारने त्याच्या या आगामी चित्रपटाची माहिती दिली होती. त्यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी याबद्दल घोषणा केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. अशातच कालच त्यांच्या या नवीन चित्रपटाचं पहिला पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. यामधून या चित्रपटातील अक्षय व सैफ यांचा वेगळाच लूक पाहायला मिळतोय. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. पण अनेकांना माहीत नसेल हा चित्रपट १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मोहनलाल यांच्या कल्ट सिनेमाचा रिमेक आहे.

मोहनलाल यांच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक आहे ‘हैवान’

प्रियदर्शन दिग्दर्शित हैवानचं पहिलं पोस्टर समोर आल्यानंतर हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्या २०१६मध्ये रिलीज झालेल्या ‘ओप्पम’ या सायको-थ्रिलर चित्रपटाचा रिमेक असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. मोहनलाल यांचा ‘ओप्पम’ हा चित्रपट आजही मल्याळम सिनेसृष्टीतील कल्ट थ्रिलरपैकी एक मानला जातो आणि ‘हैवान’ हा त्याचाच अधिकृत हिंदी रिमेक असल्याचं सांगितलं जात आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओप्पम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. या चित्रपटात अभिनेते मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती, तर समुथिरकानी खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची कथा सूडभावनेवर आधारित आहे. एका कैद्याला एका पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध प्रचंड राग असतो, कारण त्याच्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचा त्याचा समज असतो. त्यामुळे तो त्या पोलिस अधिकाऱ्याकडून बदला घेण्याचा निर्णय घेतो.

मात्र, त्याच्या या सूडाच्या मार्गात एक दृष्टिहीन व्यक्ती उभी राहते. ही व्यक्ती त्या पोलिस अधिकाऱ्याची विश्वासू असते. खलनायक पोलिसाच्या मुलीला लक्ष्य बनवतो, पण तिला वाचवण्यासाठी हा दृष्टिहीन नायक जीवाची बाजी लावतो. सूड, थरार आणि सस्पेन्सने भरलेली ‘ओप्पम’ची कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ‘ओप्पम’मधील हेच थरारक कथानक आता अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या ‘हैवान’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘हैवान’ हा ‘ओप्पम’चा अधिकृत हिंदी रिमेक मानला जात आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. त्यामुळे या रिमेकबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. व्यावसायिकदृष्ट्या ‘ओप्पम’ हा चित्रपट यशस्वी ठरला होता. त्यामुळे आता ‘हैवान’लाही प्रेक्षकांकडून तितकाच प्रतिसाद मिळतो का, हे येत्या काळात कळेल. ‘हैवान’ ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.