Bollywood Director Talks About Akshaye Kumar : अक्षय कुमार बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं त्याच्या विनोदी शैलीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. अक्षय कुमार इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अशातच आता त्याच्याबरोबर काम केलेल्या निर्मात्यानं तो आधी बिझनेसमॅन आहे आणि मग अभिनेता, असं त्यांनी म्हटलं आहे.
निर्माते शैलेंद्र सिंह यांनी एका मुलाखतीत अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केलेली आणि त्यावर कोट्यवधी खर्च केले होते. पण, तो चित्रपट काही चालला नाही आणि त्यांचं मोठं नुकसान झालं म्हणून त्यांनी जेव्हा अक्षयला काही पैसे परत करायला सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिल्याची माहिती दिली आहे.
सिद्धार्थ कननशी संवाद साधताना शैलेंद्र यांनी सांगितलं की, अक्षय कुमार पूर्वी खूप चांगला होता आणि ते दोघे एकत्र अनेक स्पोर्टस् खेळायचे. त्यामुळे शैलेंद्र यांना जेव्हा त्याच्याबरोबर चित्रपट बनवण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्या संधीचा उपयोग केला. त्यांनी सांगितलं की, अक्षय कुमारलासुद्धा कथा आवडलेली. पुढे चित्रपट मुन्नारमध्ये चित्रित होणार होता; पण अक्षयमुळे कॅनडामध्ये शूट झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चित्रपटाचं आधीचं बजेट ३०-३५ कोटी इतकं होतं, असं म्हटलं.
अक्षय कुमारबद्दल नेमकं काय म्हणाला दिग्दर्शक?
अक्षयबद्दल शैलेंद्र म्हणाले, “अक्षय कामात व्यग्र असणारा माणूस आहे. त्याच्या कामाच्या वेळापत्रकामुळे आम्हाला कॅनडामध्ये शूट करावं लागलं. तिथून अनेक इतर जागी शूटिंग केलं.” शैलेंद्र यांनी ‘सिंग इज किंग’ या चित्रपटासाठी त्यांनी आधी अक्षयला विचारलं होतं; पण तो आधीच त्या चित्रपटाचा भाग झाला होता आणि या चित्रपटाची मूळ कथा आधी वेगळी होती. ते म्हणाले, “अक्षय मला म्हणाला की, मी तुझ्यासाठी तस्वीर करीत आहोत. तू मला ‘सिंग इज किंग’ करू देत. मी म्हटलं ठीक आहे; फक्त मला त्यात क्रेडिट दे.”
शैलेंद्र म्हणाले, “जेव्हा ‘तस्वीर’ प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर आपटला. मी अक्षयला म्हटलं कोणीच आपला चित्रपट पाहण्यासाठी आलं नाही. तुला काही जबाबदारी घ्यावी लागेल. त्यासाठी तू माझ्याकडून खूप पैसे घेतले आहेत.” अक्षयबद्दल निर्माते पुढे म्हणाले, “अक्षय खूप चांगला माणूस आहे; पण खूप व्यावसायिक माणूस आहे. त्याची वेगळी पद्धत आहे. तो आधी तुमच्याकडून १५ कोटी घेतो. नंतर तो २१ कोटी, मग पुन्हा २१ कोटी व त्यानंतर २७ कोटी, असे पैसे मागतो. त्यानंतर ३३ कोटी आणि पुन्हा २६ कोटी, अशा टप्प्यांत पैसे मागतो. त्याला बिझनेस माहीत आहे. तो बिझनेस मॅन आहे आधी आणि मग अभिनेता आहे. त्यानं फक्त एका गाण्यावर डान्स करण्यासाठी माझ्याकडून नऊ कोटी घेतले होते.”

