Akshay Kumar on Ranveer Singh: सध्या प्रेक्षक ‘धुरंधर २’ या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा १९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच पेड प्रीव्ह्यू आणि ॲडव्हॉन्स बुकिंगमधून सिनेमाने जगभरात कोट्यवधींची कमाई केली आहे.
‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने रेहमान डकैत ही भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शेवटी रेहमान डकैतचा मृत्यू झाला होता, त्यामुळे ‘धुरंधर २’मध्ये आता काही नवीन चेहरे दिसणार का, अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळत आहे; तर रणवीर सिंहच्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घेण्यासासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
या सगळ्यात अक्षय कुमारने ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल वक्तव्य केले. अभिनेत्याने नुकतीच ‘इंडिया टुडे’च्या कॉनक्लेव्हमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तो चित्रपटसृष्टीबद्दल म्हणाला, “चित्रपटसृष्टी दर २ ते ३ वर्षांनी बदलत राहते. आपले प्रेक्षक त्यांना काय हवे यानुसार बदलत राहतात.”
“रणवीर सिंहसारख्या अभिनेत्याने…”
अभिनेता पुढे म्हणाला, “धुरंधर सिनेमाचे उदाहरण बघा. तो एक ॲक्शन चित्रपट आहे, त्यामध्ये रक्तपात पाहायला मिळतो. एक उत्तम सिनेमा आहे आणि लोकांनासुद्धा तो सिनेमा आवडला. रणवीर सिंहसारख्या अभिनेत्याने एका रागीट तरुणाची भूमिका साकारली. मध्यंतरी अशा भूमिका साकारल्या जात नव्हत्या. पाच ते सहा वर्षांपूर्वी मी काही सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट बनवले होते, ते खूप चांगल्या पद्धतीने चालले. सध्या हॉरर कॉमेडी चित्रपटदेखील मोठ्या प्रमाणात चालत आहेत. ‘स्त्री’ या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये बदल होत आहेत. आम्हाला माहीत नाही की प्रेक्षकांना भविष्यात काय पाहायला आवडेल.”
त्याला विचारले की धुरंधरसारख्या सिनेमात भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही, याबद्दल पश्चात्ताप वाटतो का? इर्ष्या वाटते का? त्यावर अक्षय कुमार म्हणाला, “ल्यारी गँगसाठी मी योग्य असेन, असा विचार आदित्यने केला नसावा. त्याने तो विचार केला नाही आणि त्यामुळे मला त्यामध्ये भूमिका मिळाली नाही.”
अक्षय कुमार म्हणाला, “मी रणवीरला भेटलो आहे, त्याने माझ्या कामाचे कौतुक केले. अशा काही भूमिका होत्या, ज्या त्याला साकारायच्या होत्या, ज्या मला मिळाल्या तसेच माझ्या बाबतीतही झाले; ज्या भूमिका मला साकारायच्या होत्या, त्या त्याला मिळाल्या. हिंदी सिनेमामध्ये आम्ही १५-२० अभिनेते आहोत आणि भारतात १८० चित्रपट बनत आहेत, त्यामुळे प्रत्येकासाठी काम आहे. प्रत्येकाला भूमिका मिळत आहेत. आपल्यालासुद्धा तशी भूमिका साकारायला मिळायला पाहिजे होती, असा पश्चात्ताप असतो पण मला त्याच्याबद्दल इर्ष्या वाटत नाही”, असे म्हणत धुरंधरमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली नसली तरी रणवीरबद्दल कोणतीही इर्ष्या वाटत नाही.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे तर तो लवकरच ‘भूत बंगला’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १० एप्रिल २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच तो ‘हेरा फेरी ३’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘गोलमाल ५’ मध्येदेखील दिसणार आहे.
