Akshay Kumar on Prostate Cancer: भारतात कॅन्सर रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक कलाकारांनाही कॅन्सरचे निदान झाले आहे. अशातच बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे वडील हरी ओम भाटिया यांचे २००० मध्ये ‘प्रोस्टेट कॅन्सर’मुळे निधन झाले होते. आता अक्षयने सर्व पुरुषांना दरवर्षी ‘प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटीजेन’ (PSA) चाचणी करून घेण्याचं आवाहन केलंय.

अक्षय कुमारने त्याच्या वडिलांना गमावण्यामागचं एक मुख्य कारण सांगितलं. वयाच्या ५०-५५ वर्षांनंतर PSA चाचणी केली जाते. प्रोस्टेट कॅन्सरचे वेळेत निदान करण्यासाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची असते, परंतु त्याकाळी याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती, असं अक्षय कुमार ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये म्हणाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजदीप सरदेसाई यांनी अक्षयला सांगितलं की त्यांनी गेल्या वर्षी प्रोस्टेट कॅन्सरवर मात केली आहे. हे ऐकल्यानंतर अक्षयने वडिलांची आठवण सांगितली. भावुक होत अक्षय कुमार म्हणाला, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला, माझ्या वडिलांना गमावले. ६७ व्या वर्षी ते आम्हाला सोडून गेले. ते माझ्यासाठी सर्वस्व होते.”

Award Banner

अक्षय कुमारचा पुरुषांना सल्ला

अक्षय कुमारने सांगितलं की, त्यावेळी त्याच्या वडिलांना, कुटुंबाला या नियमित तपासणीबद्दल माहित नव्हतं. “वयाच्या ५०-५५ वर्षांनंतर प्रत्येकाने आपली PSA टेस्ट करून घेणं आवश्यक आहे, हे मला तेव्हा माहीतच नव्हतं. मी इथे उपस्थित असलेल्या आणि माझं ऐकणाऱ्या सर्व पुरुषांना सांगतोय की, ही चाचणी करणं किती गरजेचं आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यामुळेच आज मी प्रेक्षकांना याबद्दल सांगायचं ठरवलं,” असं अक्षय कुमार म्हणाला.

वेळीच निदान झाले तर जीव वाचू शकतो

कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाबद्दल अक्षयने भाष्य केलं. “प्रोस्टेट कॅन्सर खूप सामान्य झाला आहे. दर तिसऱ्या पुरुषाला याचा धोका असू शकतो. जर या आजाराचे सुरुवातीच्या काळात निदान झाले, तर जीव वाचू शकतो. ही चाचणी करून तुम्ही केवळ स्वतःचाच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार वाचवू शकता,” असं अक्षय कुमारने नमूद केलं.

PSA चाचणी काय आहे?

प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटीजेन (PSA) हे एक प्रकारचे प्रोटीन आहे, जे प्रोस्टेटच्या पेशींद्वारे तयार केले जाते. PSA ब्लड टेस्टद्वारे तुमच्या रक्तातील प्रोटीन मोजते. प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं ओळखण्यासाठी किंवा त्याची तपासणी करण्यासाठी ही चाचणी केली जाते.