Akshay Kumar Sold Mumbai House: बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. एकीकडे त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे, तर दुसरीकडे अक्षयने त्याचे मुंबईतील आलिशान घर विकून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्याने मुलुंड येथील दोन आलिशान अपार्टमेंट्स विकल्या असून यातून त्याने चांगलीच कमाई केली आहे. अक्षय कुमारने किती पैसे कमावले, याचा आकडा वाचून नेटकरी थक्क झाले आहेत. दोन घरे विकून अक्षयने किती पैसे कमावले हे जाणून घेऊया.

अक्षय कुमारचे चित्रपट नेहमीच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असतात. त्याचा मोठा चाहता वर्ग असून त्याच्या सिनेमांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. सिनेविश्वामध्ये अनेक वर्षे काम केलेल्या अक्षयने मुंबईमध्ये २०१७ साली दोन घरे खरेदी केली होती. त्यावेळी या दोन घरांची किंमत सुमारे ९ कोटी होती. नऊ वर्षांपूर्वी अक्षयने या सदानिका खरेदी केल्या होत्या. आता त्याने दोन्ही लक्झरी अपार्टमेंट्स विकले असून कोट्यवधींचा फायदा मिळवला आहे.

अक्षय कुमारने किती कोटींमध्ये केला व्यवहार?

मुंबईतील घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना अक्षयने त्याच्या दोन लक्झरी घरांची विक्री केली आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’ (CRE Matrix)तील मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांनुसार, ‘सनी होम केअर प्रायव्हेट लिमिटेड’ने हे दोन्ही अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. प्रत्येक अपार्टमेंट ६.१९ कोटी रुपयांना विकले गेले. अक्षय कुमारने हे अपार्टमेंट्स एकूण १२.३८ कोटी रुपयांना विकल्या आहेत. दोन घरांच्या या व्यवहारासाठी ३७.१४ लाख रुपये मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरले असून दोन घरांसाठी एकूण ७४.२८ लाख रुपये शुल्क भरले गेले. या विक्री करारांची नोंदणी ३० जून २०२६ रोजी करण्यात आली.

अक्षयला किती झाला नफा?

नोंदणी कागदपत्रांनुसार, अक्षय कुमारने हे दोन्ही अपार्टमेंट्स ऑक्टोबर २०१७ मध्ये प्रत्येकी सुमारे ४.४९ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता जवळपास नऊ वर्षांनंतर त्याने प्रत्येक फ्लॅटवर सुमारे १.७० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. नोंदणीकृत व्यवहारांनुसार, या मालमत्तेच्या किमतीत सुमारे ३८ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.

‘वेलकम टू द जंगल’ ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा २६ जून २०२६ ला प्रदर्शित झाला असून यामध्ये बॉलीवूडमधील ३० हून अधिक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. अक्षयसह सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, दिशा पाटणी, राजपाल यादव, रवीना टंडन आणि श्रेयस तळपदे अशा अनेक कलाकारांचा समावेश यात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.