Akshay Kumar on Rajesh Khanna: अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. तसेच त्याच्या मुलाखतीतील अनेक वक्तव्येदेखील लक्ष वेधून घेत आहेत. याबरोबरच अभिनेता ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. स्पर्धकांशी संवाद साधताना तो त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगतो, आठवणी सांगतो; त्याचीदेखील अनेकदा चर्चा होताना दिसते.

या शोमध्ये त्याने लहानपणीची आठवण सांगितली. त्याने एकदा सुपरस्टार राजेश खन्ना यांना पाहिले होते. त्यावेळी मला माहीत नव्हते की मी त्यांचा जावई होईन. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

“आम्ही त्यांना दुरून…”

‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ या शोमध्ये तो म्हणाला, “ही गोष्ट आजही माझ्या लक्षात आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे आई-वडील मला खांद्यावर बसवून कार्टर रोड आणि बँडस्टँडला फिरण्यासाठी न्यायचे, तेव्हा माझ्या सासऱ्यांची गाडी तिथे यायची, तेव्हा ते माझे सासरे नव्हते तर तेव्हा तिथे राजेश खन्नाजी यांची गाडी यायची. आम्ही त्यांना दुरून पाहायचो. हे अगदी खरं सांगत आहे, कोणीच कधीच हा विचार केला नव्हता की माझे लग्न त्यांच्या मुलीशी होईल.”

Award Banner

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अक्षय कुमारला कोणत्या कलाकारांकडून प्रेरणा मिळते असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अक्षयने अमिताभ बच्चन, मेहमूद व संजीव कुमार यांची नावे घेतली. त्यावेळी त्याला सासरे राजेश खन्नांचे नाव का घेतले नाही असे विचारले; त्यावर अक्षय म्हणाला, “मी माझ्या सासऱ्यांकडून खूप काही शिकलो आहे. काय करू नये हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. ते अनेकदा त्यांच्या चुकांबद्दल मला सांगायचे, मी पाहिलेले ते भारतातील नंबर वन सुपस्टार होते.”

अक्षय कुमारने याच शोमध्ये नुकतेच शिक्षणाबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांसमोर अनेकदा कमीपणा वाटतो असे तो म्हणाला. तसेच त्याने हादेखील खुलासा केला की पत्नी ट्विंकल खन्नाने चार पुस्तके लिहिली आहेत, पण त्याने त्यातील एकही पुस्तक वाचले नाही.

दरम्यान, अक्षय कुमार ‘भूत बंगला’ या सिनेमाबरोबर ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याची महत्त्वाची भूमिका असलेला ‘हेरा फेरी ३’ हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.