Akshay Kumar on Rajesh Khanna and Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन व राजेश खन्ना या दोन्ही अभिनेत्यांचे हिंदी सिनेसृष्टीत महत्त्वाचे स्थान आहे. या दोन्ही अभिनेत्यांचे अनेक सिनेमे प्रचंड गाजले. त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. असे म्हटले जाते की, राजेश खन्ना यांना जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी लोकप्रियता कोणत्याही कलाकाराला मिळाली नाही. मात्र,एक काळ असाही आला जेव्हा त्यांची लोकप्रियता संपली. चाहतावर्ग कमी झाला.

याचदरम्यान अमिताभ बच्चन यांचे चित्रपट गाजत होते. आजही या दोन्ही कलाकारांमध्ये असलेली स्पर्धा, त्यांच्यातील ईर्षा यांबद्दल आजही बोलले जाते. आता अमिताभ बच्चन व राजेश खन्ना चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे.

अक्षय कुमारने नुकतीच अक्षय कुमारने इंडिया टुडेला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्याने अमिताभ बच्चन हे त्याचे प्रेरणास्थान असल्याचे म्हटले. त्यावर त्याचे सासरे राजेश खन्ना का प्रेरणास्थानी नाहीत, असे विचारले गेले. त्यावर अक्षयने दिलेले उत्तर चर्चेत आहे.

“मी माझ्या सासऱ्यांकडून खूप…”

अक्षय कुमारला कोणत्या कलाकारांकडून प्रेरणा मिळते, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अक्षयने अमिताभ बच्चन, मेहमूद व संजीव कुमार यांची नावे घेतली. त्यावेळी त्याला सासरे राजेश खन्नांचे नाव का घेतले नाही, असे विचारले गेले. त्यावर अक्षय म्हणाला, “मी माझ्या सासऱ्यांकडून खूप काही शिकलो आहे. काय करू नये हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. ते अनेकदा त्यांच्या चुकांबद्दल मला सांगायचे. मी पाहिलेले ते भारतातील नंबर वन सुपस्टार होते.”

याआधीदेखील अक्षय कुमारने गल्लाटा प्लसला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीतदेखील त्याने राजेश खन्नांबद्दल वक्तव्य केले होते. यश आणि अपयशाबद्दल त्याला विचारण्यात आले होते. त्यावर राजेश खन्नांचे अक्षयने उदाहरण दिले होते. तो म्हणाला होता, “यश मी माझ्या डोक्यात जाऊ देत नाही. मी अनेकांचा पडता काळ पाहिला आहे. अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. माझ्या सासऱ्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. कारण- त्यांनी सर्वांत जास्त यश पाहिले होते आणि त्यानंतर त्यांना सर्वांत मोठा पडता काळ पाहावा लागला. मी लोकांकडून गोष्टी ऐकतो. त्यांचे अनुभव ऐकतो, त्यावरून मला जाणीव झाली की, अशा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. काम करत राहणे हे माझे काम आहे.”

राजेश खन्ना हे हिंदी सिनेमातील पहिले सुपरस्टार होते. बॉक्स ऑफिसवर त्यांचे सलग १७ सिनेमे हिट ठरले इतकी त्यांची लोकप्रियता होती. १९७० च्या दशकात अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता वाढू लागली. शोले, जंजीर या चित्रपटांतून अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळाली. त्यांचे सिनेमे गाजू लागले. त्यानंतर राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यात स्पर्धा वाढली. दरम्यानच्या काळात राजेश खन्ना यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरू लागले. त्यांना जे यश मिळाले होते, ते नंतरच्या काळात टिकू शकले नाही. चित्रपटात अपयश मिळाल्यानंतर राजेश खन्ना यांनी टेलिव्हिजनवरही काम केले; मात्र तिथेही त्यांना यश मिळाले नाही.

दरम्यान, राजेश खन्ना रियासत या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते.