Akshay Kumar Fight In Party : नुकत्याच एका कार्यक्रमात अक्षयने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीबद्दल सांगितलं. अभिनेत्याच्या आयुष्यात अशी कोणती घटना घडली होती? चला जाणून घेऊ..
एका मोठ्या पार्टीत अक्षयने रागाच्या भरात एका माणसाला कानशिलात लागावली होती. यामुळे त्या माणसाला काही क्षण शुद्धही नव्हती. या घटनेनंतर अक्षय खूप घाबरला होता. भर पार्टीत केलेल्या या कृत्याने आपल्या करिअरवर काही परिणाम होईल की काय अशी काळजी त्याला सतावत होती.
‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ या कार्यक्रमाच्या विशेष भागात ‘शार्क टँक इंडिया’मधील अमन गुप्ता, अनुपम मित्तल आणि नमिता थापर सहभागी झाले होते. त्यावेळी अमन गुप्ताने अक्षयला विचारलं, “तुझ्या आयुष्यातील असा कुठला क्षण आहे, ज्याबद्दल आजही वाईट वाटतं?” या प्रश्नावर अक्षय भूतकाळातला तो प्रसंग सांगितला.
अक्षयने सांगितलं की, तो एका मित्राबरोबर पार्टीला गेला होता. तिथे अचानक वाद सुरू झाला. एक माणूस त्याच्या मित्राला सतत शिवीगाळ करत होता. अक्षयने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. अक्षय म्हणाला, “त्याने एकदा शिवी दिली, मी त्याला थांबवलं. पुन्हा दिली, तरीही समजावलं. तिसऱ्यांदा दिली. मी चार-पाच वेळा त्याला समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याने खूप घाणेरडी भाषा वापरली होती. मित्राचा अपमान मी सहन करू शकलो नाही.”
रागाच्या भरात अक्षयने त्या माणसाला कानाखाली मारली आणि तो माणूस बेशुद्धच पडला. त्याक्षणी अक्षय घाबरला. याबद्दल अक्षय म्हणाला, “ती खूप मोठी पार्टी होती. माझा मित्र तर रडू लागला होता. आम्ही त्याच्या चेहऱ्यावर पाणी टाकत होतो आणि तो शुद्धीवर येण्यासाठी मी देवाला प्रार्थना करत होतो. तेव्हा मला खूप भीती वाटली होती.”
दरम्यान, अक्षय कुमारच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात परेश रावल आणि वामिका गब्बी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हैवान’ हे चित्रपटही त्यांच्या आगामी यादीत आहेत. तसेच, अक्षय सध्या ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ हा शो होस्ट करत आहेत. हा कार्यक्रम २७ जानेवारीपासून सोनी टीव्ही आणि सोनीलिव्हवर सुरू झाला आहे.

