Hera Pheri 3 Copyright Disputes : ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच काहीना काही कारणांनी चर्चेत आहे. या चित्रपटाभोवतीचे कायदेशीर वाद काही केल्या संपताना दिसत नाहीयत. आधी चित्रपटातील मुख्य कलाकार अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातील वाद चर्चेत आला. हा वादमिटताच आता हा चित्रपट कॉपीराइटच्या वादात अडकला आहे.

एका दाक्षिणात्य निर्मात्याने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याकडे ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीचे हक्कच नाहीत, असा दावा केला आहे. त्यामुळे आता ‘हेरा फेरी ३’बाबत आता नवा वाद उभा राहिला आहे.

Bar and Bench च्या अहवालानुसार, Seven Arts International या प्रॉडक्शन हाऊसने असा दावा केला आहे की, फिरोज नाडियाडवाला यांना फक्त एका चित्रपटाचा रिमेक करण्याचा अधिकार देण्यात आला होता. १९८९ साली आलेल्या मल्याळम चित्रपट ‘रामजी राव स्पीकिंग’च्या २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’चेच राईट्स त्यांना देण्यात आले होते.

मात्र, निर्मात्याचा आरोप आहे की नाडियाडवाला यांनी कराराचं उल्लंघन करत २००६ साली ‘फिर हेरा फेरी’ हा सिक्वेल तयार केला. इतकंच नाही, तर पुढे या फ्रँचायझीचे हक्क त्यांनी तिसऱ्या व्यक्तीला विकले. ही तिसरी व्यक्ती म्हणजे, अक्षय कुमारची प्रॉडक्शन कंपनी Cape of Good Films.

या आरोपांनंतर मद्रास उच्च न्यायालयाने वाद न्यायालयात प्रलंबित असताना फिरोज नाडियाडवाला यांना असा चित्रपट बनवणं कायदेशीर आहे का? अशी विचारणा करण्यात आली. याबद्दल हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना Seven Arts International चे संचालक जी.पी. विजयकुमार यांनी सांगितले की, त्यांनी मूळ निर्मात्यांकडून ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. ते म्हणाले, “मी २०२२ मध्ये ‘रामजी राव स्पीकिंग’ या चित्रपटाचे मूळ निर्माते Adithya Films यांच्याकडून ‘हेरा फेरी’चे राईट्स खरेदी केले. त्यांनी मला सांगितले होते की फिरोज नाडियाडवाला यांना फक्त एका चित्रपटाच्या रिमेकची परवानगी होती. पण त्यांनी २००६ मध्ये दुसरा चित्रपटही बनवला. त्यांना सिक्वेल आणि पुढील भागांचा किंवा पात्रांचा वापर करण्याचे काहीच राईट्स नव्हते.”

विजयकुमार पुढे म्हणाले, “आम्ही अक्षय कुमार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आम्हाला कळलं की, फिरोज नाडियाडवाला यांनी या फ्रँचायझीचे हक्क अक्षय कुमारच्या Cape of Good Films ला विकले आहेत. याबाबत आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. याप्रकरणी न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.”

दरम्यान, अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, फिरोज नाडियाडवाला यांच्याकडे ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीचे पूर्ण हक्क आहेत.” याबाबत फिरोज नाडियाडवाला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर ‘हेरा फेरी ३’चे दिग्दर्शन करणारे प्रियदर्शन यांनी यावर “मला काहीच माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.