२००५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बरसात’ हा चित्रपट सुरुवातीला अक्षय कुमारला ऑफर करण्यात आला होता. या सिनेमातील एका गाण्यासाठी अक्षयने शूट सुद्धा केलं होतं. मात्र, त्यानंतर खिलाडी कुमारने ऐनवेळी ‘बरसात’मधून एक्झिट घेतली आणि पुढे यामध्ये बॉबी देओलने प्रमुख भूमिका साकारली. सामान्यत: मानधन, तारखा जुळत नसल्याने मुख्य अभिनेत्यांकडून एखाद्या सिनेमासाठी नकार दिला जातो. मात्र, या सगळ्या पलीकडे जाऊन अक्षयने सिनेमासाठी नकार देण्याचं कारण होती प्रियांका चोप्रा.
दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी काही महिन्यांपूर्वी ‘फ्रायडे टॉकीज’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना याबाबत खुलासा केला होता. अक्षय कुमार-प्रियांका चोप्राची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. या दोघांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलेलं आहे, यांची केमिस्ट्री एकेकाळी चर्चेचा विषय ठरली होती. पण, त्यानंतर एक दिवस असा आला जेव्हा अक्षयने प्रियांकासह भविष्यात काम न करण्याचा निर्णय घेतला.
२००४-२००५ च्या दरम्यान अक्षय व प्रियांकाच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. याचा परिणाम आपल्या संसारावर होऊ नये यासाठी अक्षयने सिनेमातून एक्झिट घेतल्याचं सुनील दर्शन यांनी सांगितलं. ते म्हणाले, “बरसात चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारणार होता. पण, त्यावेळी सर्वत्र अक्षय-प्रियांकाच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला होता. इतकंच नव्हे तर, अक्षयची पत्नी यामुळे घर सोडून गेली होती.”
“एक अभिनेता म्हणून तुम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे. जर तुमची पत्नी अभिनेत्री असेल, तिला इंडस्ट्रीमधल्या सगळ्या गोष्टी माहिती असतील आणि त्यातही तिने मोठ्या स्टार्सबरोबर काम केलेलं असेल तर अशावेळी काळजी घेतली पाहिजे. मी या परिस्थितीसाठी प्रियांकाला अजिबात जबाबदार धरत नाही. तिला ( प्रियांका ) योग्य वाटत होतं ते ती करत होती.” असं सुनील दर्शन यांनी सांगितलं. पुढे या सिनेमात बॉबी देओलने मुख्य भूमिका साकारली.
यानंतर प्रियांका चोप्राला देखील या अफेअरच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं होतं. “जर अफेअरच्या चर्चा खोट्या आहेत, त्यात काहीच तथ्य नाहीये मग तू अक्षय कुमारबरोबर काम करणं का थांबवलं?” यावर अभिनेत्री म्हणाली होती, “ज्यामुळे आपलं आयुष्य अधिक सोपं होईल असेच मार्ग मी नेहमी निवडते. मला कोणाच्याही आनंदी आयुष्यात हस्तक्षेप करायचा नव्हता. या अफवा मीडियामुळे पसरल्या होत्या.”

