अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. २६ जूनला हा चित्रपट तिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ज्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. यामगचं कारण म्हणजे या चित्रपटातील मोठी स्टारकास्ट. यामध्ये बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळणार आहे.

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामुळे चर्चेत असतानाच अक्षयने धर्माबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तो आता पुन्हा चर्चेत आलाय. अक्षय अनेकदा सर्व सणवार साजरे करताना दिसतो. त्याने अनेक धार्मिक स्थळांना दानसुद्धा केलं आहे. पण आता अभिनेत्याने तो कोणत्या धर्मात मानतो आणि याबद्दल त्याचं काय मत आहे हे सांगितलं आहे.

माझा हिंदू धर्मावर विश्वास – अक्षय कुमार

ब्रुट इंडियाशी संवाद साधताना अक्षय कुमार याबद्दल म्हणाला, “माझा हिंदू धर्मावर विश्वास आहे कारण माझ्या आई-वडीलांनी मला शिकवलं आहे. मी हिंदू आहे आणि माझ्या धर्मात मानतो पण मी कोणावरही थोपत नाही. कारण तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो.”

अक्षय कुमारने यावेळी तो हिंदू असून त्याचा त्यावर विश्वास असल्याचं म्हटलं असलं तरी त्याच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्यावेळी अभिनेत्याने याबद्दल वेगळी प्रतिक्रिया दिली होती. पीटीआयशी संवाद साधताना अक्षय कुमार म्हणालेला की तो कोणताही धर्म मानत नाही. त्याच्यामते माणूसकी हाच एक धर्म आहे.

अक्षय कुमार अनेकदा विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाताना पाहायला मिळतो. अलीकडेच तो वैष्णो देवीला गेला होता. तर याचबरोबर त्याला भारतीय असल्याचाही अभिमान असून त्याने यापूर्वी विविध धार्मिक स्थलांसाठी दान केलं आहे. यामध्ये मुंबईतील हाजी अली दर्गा आणि अयोध्या येथील श्री राम मंदिरांचा समावेश आहे. यासाठी त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

दरम्यान, २६ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या मल्टिस्टारर चित्रपटात अक्षय कुमारबरोबर जॅकलिन फर्नांडिस, दिशा पाटनी, लारा दत्ता, परेश रावल, सुनील शेट्टी, राजपाल यादव, फरिदा जलाल आणि जॅकी श्रॉफ यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.