फराह खानला खूप राग येतो, असं म्हटलं जातं. आता अभिनेता अक्षय कुमारने फराह खानच्या रागीट स्वभावाचा एक मोठा खुलासा केला आहे. फराह खानला सेटवर प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरात ती काय बोलते तिचे तिलाच समजत नाही, असे अक्षय म्हणाला. इतकंच नव्हे तर ‘तीस मार खान’ किंवा ‘सूर्यवंशी’च्या शूटिंगदरम्यान कतरिना कैफवरप्रचंड चिडलेल्या फराहने थेट ‘माझी बंदूक कुठे आहे? मला तिच्यावर गोळी झाडायची आहे’, अशी धमकी दिली होती, अशी पोलखोल अक्षय कुमारने केली आहे.

‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सर्वात आधी फराहने प्रियदर्शन यांना तुम्हाला सेटवर कधी राग येतो का? असा प्रश्न विचारला. त्यावर ज्येष्ठ दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी “मला राग येत नाही. कारण, मला माझ्या सेटवर गोंधळ अजिबात आवडत नाही,” असं म्हटलं. या चर्चेत अक्षय कुमार सहभागी झाला आणि त्याने सांगितलं की फराह मात्र प्रियदर्शन यांच्यापेक्षा उलट आहे. अक्षय तिला म्हणाला, “तुला सेटवर खूप राग येतो.” अक्षय तिची ही सवय सांगत असताना मध्येच थांबला, त्यावर फराह त्याची फिरकी घेत विचारलं, “तू ‘सर्वात वाईट’ हा शब्द वापरणार होतास का?” यावर हसत अक्षय म्हणाला, “नाही, मला म्हणायचं होतं की… तू रागाच्या भरात स्वतः काय बोलतेस याचं भान तुला राहत नाही.” यावर फराहने आक्षेप घेतला आणि “मी काय बोलते हे मला नेहमी माहित असतं,” असं म्हणाली.

अक्षय कुमारने सांगितला फराह खानचा किस्सा

अक्षयने पुढे कतरिना कैफबरोबर घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, “एकदा तू कतरिनावर खूप चिडली होतीस. तू थेट ‘माझी बंदूक कुठे आहे?’ असं म्हणाली होतीस.” हे सांगताना अक्षय हसू लागला. पुढे म्हणाला, “असं कोण म्हणतं की माझी बंदूक कुठे आहे? तिच्याकडे कधी बंदूक नव्हतीच! पण तिला कतरिनावर गोळी झाडायची होती.” अक्षयने हा किस्सा सांगितल्यावर सगळेच हसू लागले. पुढे प्रियदर्शन गमतीत म्हणाले, “माझा सेट नेहमी शांत असतो. तिथे फक्त एकच आवाज ऐकू येतो, तो म्हणजे फराहचा!”

स्वतःची बाजू मांडत फराह म्हणाली, “पण सर, खूप लवकर शूटिंग पूर्ण करते हे पण तुम्ही पाहा.” अक्षय आणि प्रियदर्शन या दोघांनीही तिची ही गोष्ट लगेच मान्य केली आणि सेटवरील तिच्या कामाचं कौतुक केले. हे तिघे नेमके कोणत्या प्रोजेक्टबद्दल बोलत होते, त्याचा खुलासा त्यांनी केला नाही. पण फराहने कतरिनाबरोबर ‘तीस मार खान’मधील ‘शीला की जवानी’ आणि ‘सूर्यवंशी’मधील ‘टिप टिप’ या गाण्यांसाठी काम केलंय.

‘तीस मार खान’च्या अपयशामुळे नैराश्यात गेलेली फराह खान

‘तीस मार खान’ हा फराहचा सर्वात वादग्रस्त चित्रपट होता. रिलीजनंतर त्यावर प्रचंड टीका झाली होती. या टीकेचा आपल्या मनावर किती वाईट परिणाम झाला होता, याबद्दल फराहने अनेकदा सांगितलंय. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्याशी गप्पा मारताना फराह म्हणाली, “आजच्या Gen Z पिढीसाठी ‘तीस मार खान’ हा एक सुपरहिट सिनेमा आहे. त्यांना माझ्या इतर चित्रपटांशी काही देणंघेणं नाही, त्यांना हाच चित्रपट सर्वोत्तम वाटतो. पण मला आठवतंय, जेव्हा हा चित्रपट फ्लॉप झाला, तेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वजण फार आनंदी होते. आपल्या इंडस्ट्रीत तुमच्या यशाचा आनंद होण्यापेक्षा, लोकांना इतरांच्या अपयशाचा जास्त आनंद होतो.”

‘शीला की जवानी’ सर्वात स्वस्त गाणं

सिनेमा कसाही असला तरी ‘शीला की जवानी’ गाणं खूप गाजलं होतं. हे गाणं बॉलीवूडमधील आजवरच्या सर्वात मोठ्या हिट गाण्यांपैकी एक आहे. गाण्याचं बजेट खूप कमी असल्याचं फराहनेच सांगितलं होतं. “जेव्हा कोणी मोठ्या बजेटमध्ये गाणं बनवल्याचा मोठेपणा सांगतं, तेव्हा मला अजिबात कौतुक वाटत नाही. कारण माझ्यामते बजेट जितकं कमी, तितका जास्त चांगला विचार तुम्ही करता. माझ्या आयुष्यातील सर्वात स्वस्त गाणं ‘शीला की जवानी’ होय. आमच्याकडे कोणताही मोठा सेट नव्हता. आमच्याकडे फक्त १० डान्सर्स होते. आम्ही अवघ्या साडेतीन दिवसांत हे गाणं शूट केलं. हे माझ्या करिअरमधील सर्वात स्वस्त गाणं आहे आणि माझ्या करिअरमधील सर्वात मोठी हिट गाणी, जी टॉप ३ किंवा ४ मध्ये येतात, त्यापैकी हे एक आहे,” असं फराह खानने म्हटलं होतं.