सध्या काही हिंदी-मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘भूत बंगला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच, पूजा सावंतची प्रमुख भूमिका असलेला ‘सालबर्डी’ हा सिनेमादेखील प्रदर्शित झाला आहे.
‘भूत बंगला’ सिनेमात अक्षय कुमारबरोबरच मिथिला पालकर, असरानी, राजपाल यादव, तब्बू, वामिका गब्बी, परेश रावल हे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता चित्रपटातील काही सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या सगळ्यात अभिनेत्याचे एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. अक्षय कुमारने नुकतीच शुभंकर मिश्राला मुलाखत दिली. याआधी अभिनेत्याने त्याच्या मानधनाबद्दल खुलासा केला होता. तो म्हणालेला की, चित्रपटासाठी मला मानधन हे एकरकमी दिले जात नसे, तर दिवसाप्रमाणे त्याला पैसे दिले जात असत. आता शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या मानधनाबद्दल खुलासा केला आहे. एका दिवसाला त्याला किती मानधन मिळत असे याबद्दल त्याने सांगितले आहे.
“मी दररोज सुमारे ८ ते ९ लाख…”
‘जानी दुश्मन : एक अनोखी कहानी’ हा सिनेमा २००२ ला प्रदर्शित झाला होता. त्यादरम्यान अभिनेत्याला किती मानधन मिळायचे याबद्दल अक्षय कुमार म्हणाला, “त्या वेळी मला चांगले पैसे मिळायचे; मी दररोज सुमारे ८ ते ९ लाख रुपये कमवायचो.”
याआधी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला होता. तो म्हणालेला, “चित्रपटात अरमान कोहली मला मारून टाकतो, त्यावेळी मला दिवसाप्रमाणे पैसे मिळत असत आणि मला फ्लॅट खरेदी करायचा होता. कोणत्यातरी कलाकाराच्या तारखा जुळत नसल्याचे मला माहीत झाले; तर मी दिग्दर्शक राजकुमार कोहली यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो की मी पुढे सिनेमात काम करू का? ते सुरुवातीला नाही म्हणाले. ते म्हणालेले की सिनेमात तुझे पात्र मेले आहे, पण काही वेळानंतर त्यांनी विचार बदलला. ते म्हणाले की मी तू कोमात गेला आहेस असे दाखवतो. मग तू परत ये.”
अभिनेता पुढे म्हणाला, “जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला जाणवेल की माझे पात्र अचानक कोमामध्ये गेलेले दिसते, ते मरत नाही. मी त्यानंतर शुद्धीत येतो आणि पुन्हा मारामारी करतो. तर आणखी पाच दिवस मी शूटिंग केले. त्याच पाच दिवसांचे मला मानधन मिळाले. अशा प्रकारे ‘जानी दुश्मन’मधील माझी भूमिका मोठी झाली होती.”
जानी दुश्मन: एक अनोखी कहानी हा राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा सिनेमा होता. या चित्रपटात सनी देओल, सोनू निगम, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, अरशद वारसी, आदित्य पंचोली, रंभा, शरद कपूर, मनीषा कोईराला आणि अरमान कोहली यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
