अक्षय कुमार आणि सैफ अली खान त्यांच्या आगामी ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कौन बनेगा करोडपती १८’मध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमामध्ये अक्षयने अमिताभ बच्चन आणि सैफ अली खानला खळखळून हसवलं. ‘टशन’च्या शूटिंगदरम्यान सैफला करीना कपूरच्या खोलीतून बाहेर पडताना आपण पाहिल्याचा किस्सा अक्षयने सांगितला.
सैफ व अक्षय कुमार कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या नात्याचा उल्लेख केला. २००८ मध्ये ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच सैफ आणि करीनाच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली होती. त्यामुळे बिग बींनीसुद्धा सैफला याबद्दल विचारलं. अमिताभ बच्चन यांनी सैफला, “तुमची आणि तुमच्या पत्नी करीनाजींची प्रेमकहाणी टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली होती, हे खरं आहे का?” असं विचारल्यानंतर यावर सैफने “हो सर” असं म्हणत ही गोष्ट खरी असल्याचं मान्य केलं.
त्यानंतर अमिताभ बच्चन ‘टशन’मध्ये सैफबरोबर काम केलेल्या अक्षय कुमारकडे वळले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय सैफ आणि करीनाच्या आसपासच असल्याने, त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळातील काही किस्से त्याला माहीत आहेत का, असा प्रश्न त्याला विचारला. अक्षयने ‘टशन’च्या शूटिंगदरम्यानची आठवण सांगितली. त्याने सांगितलं की, शूटिंगच्या काळात तो पहाटे साधारण ४.३० वाजता उठायचा. विशेष म्हणजे, करीनाची खोली अक्षयच्या खोलीच्या अगदी शेजारीच होती.
अक्षय कुमारने केली सैफ-करीनाची पोलखोल
अक्षय याबद्दल पुढे म्हणाला, “सर, मी पहाटे साधारण ४.३० वाजता उठायचो. करीनाची खोली अगदी माझ्या खोलीच्या शेजारी होती. एके दिवशी अचानक तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि हे गृहस्थ (सैफ) बाहेर आले. मग मी विचारलं, तुम्ही काय करताय? त्यावर तो म्हणाला, काही नाही, आम्ही दोघं जॉगिंगला जातोय”. अक्षयच्या म्हणण्यानुसार, सैफने पहाटे करीनाच्या खोलीतून बाहेर पडल्याचं कारण देताना दोघंही सकाळी लवकर जॉगिंगला जाणार असल्याचं सांगितलं होतं.
सैफनेही ‘केबीसी’मध्ये हा किस्सा सांगत पुढे गंमतीने म्हटलं की, “हो! पहाटेचं जॉगिंग”.यानंतर अक्षयने मिश्कीलपणे म्हटलं, “म्हणजे जॉगिंगला जाण्यासाठी तो तिला उठवायला आला होता”. दरम्यान, सैफ अली खान आणि करीना कपूर यांची प्रेमकहाणी ‘टशन’च्या सेटवर सुरू झाली होती. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. सैफ आणि करीनाला तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुलं आहेत.
