Akshay Kumar’s son Aarav was scared of Vidya Balan after watching Bhool Bhulaiyaa : अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपटत लवकरच येत्या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच दिल्लीतील चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल बोलताना हा चित्रपट ‘भूल भुलैया’पेक्षा कसा वेगळा आहे हेही सांगितलं. यावेळी त्याने एक किस्साही सांगितला.

‘भूल भुलैया’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा मुलगा आरवची काय प्रतिक्रिया होती, हे त्याने सांगितलं आहे. विद्या बालनला पाहून त्याचा मुलगा तब्बल सहा वर्षे घाबरत होता, असं अक्षयने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना सांगितलं. ‘भूत बंगला’ आणि ‘भूल भुलैय्या’मधील फरक सांगताना अक्षय कुमार म्हणाला, “‘भूत बंगला’ हा हॉरर चित्रपट आहे; ‘भूल भुलैय्या’ हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर होता. चित्रपट सुरू होताच ती झपाटलेली असल्याचं दिसतं आणि नंतर समजतं की तिला मानसिक समस्या आहे. ‘भूत बंगला’मध्ये ‘वधुसुर’ कसा आला आणि तो असं का करतो, हे आम्ही स्पष्ट केलं आहे. हा चित्रपट मुलांसाठीही बनवला आहे.” 

अक्षय कुमारचा मुलगा ६ वर्षे विद्या बालनशी बोलत नव्हता

‘भूल भुलैय्या’ पाहिल्यानंतर त्याचा मुलगा आरव विद्या बालनला सहा वर्षं घाबरत होता, याबद्दल सांगताना अक्षय कुमार म्हणाला, “मी माझ्या मुलाशी बोलत होतो. त्याने मला सांगितलं की, ‘भूल भुलैय्या’ पहिल्यांदा पाहिल्यानंतर तो सहा वर्षं विद्या बालनला घाबरत होता. ती जेव्हा जेव्हा घरी यायची, तेव्हा तो तिला भेटायला नकार द्यायचा, तिच्या डोळ्यांतही पाहायचा नाही. त्याला तिच्यात ‘मंजुलिका’ दिसायची. तिच्याबद्दल त्याच्या मनात भीती निर्माण झाली होती. मला त्याला समजून सांगावं लागलं की ती मंजुलिका नसून विद्या आहे आणि ती खूप चांगली व्यक्ती आहे. पण तो काही समजत नव्हता. सहा वर्षे तो तिला घाबरलेलाच होता.” 

काही आठवड्यांपूर्वी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत  ‘भूल भुलैय्या’ या चित्रपटामुळे हॉरर-कॉमेडी या जॉनरची सुरुवात कशी झाली याबद्दलही सांगितलेलं. दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले, “’भूल भुलैय्या’ला काही आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. सुदैवाने आम्ही एका खूप चांगल्या स्टुडिओबरोबर काम करत होतो. जेव्हा तुम्ही एखादा वेगळा प्रयोग करता आणि निर्मात्याकडे तो चित्रपट पुढे नेण्याची ताकद असते, तेव्हा आम्हाला अधिक आत्मविश्वास मिळतो की आपण करत असलेलं काम नक्कीच यशस्वी होईल. आम्हाला आत्मविश्वास होता आणि चित्रपटानेही चांगलं यश मिळवलं, जे नंतर एक ट्रेंड बनलं.”