Akshay Kumar recalls failing thrice: अक्षय कुमार हा बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. भूत बंगला असे या सिनेमाचे नाव आहे.

प्रियदर्शन दिग्दर्शित या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकारांना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसह परेश रावल, मिथिला पालकर, तब्बू, वामिका गब्बी, राजपाल यादव असे लोकप्रिय कलाकार विविध भूमिकांमध्ये आहेत. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहत्यांनी ट्रेलरचे कौतुक केले आहे.

“९ वी पर्यंत…”

कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विविध मुलाखती देत आहेत. तसेच, सोशल मिडिया, रिअॅलिटी शो यामध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या अक्षय कुमार व्हील ऑफ फर्च्युन या शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करत आहे. या शोमध्ये तो स्पर्धकांशी गप्पा मारताना त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगतो, अनेक आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करतो. याबरोबरच, एखाद्या गोष्टीबद्दल त्याचे मत काय, याबद्दलही खुलेपणाने सांगतो.

या शोमध्ये एका स्पर्धकांशी बोलताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्याच्या मित्राकडे बोट दाखवत सांगितले की आम्ही शाळेत एकत्र होतो. पुढे तो म्हणाला, “आम्ही बालवाडीमध्ये एकत्र होतो. ९ वी पर्यंत आम्ही दोघं तीन वेळा नापास झालो होतो. ” पुढे त्याने त्याच्या मित्राला विचारले की तू शाळेत नापास का झाला? त्यावर अक्षयचा मित्र म्हणाला, “कारण मी तुमच्याबरोबर असायचो. त्यामुळे नापास झालो”, असे म्हणत अक्षयच्या मित्राने अक्षयवरच सगळी जबाबदारी ढकलली.

पुढे अक्षय त्याच्या मित्राची चेष्ठा करत म्हणाला की शहरात सायकवरुन फिरत मुलींना पाहणे, हा त्याच्या आवडता छंद होता. त्यावर अक्षयचा मित्र प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, “तुम्हाला काय वाटते, मुलींना हा पाहत असेल की मी?”

याच शोमध्ये अक्षयने जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांपुढे कधीकधी कमीपणा वाटतो, असे वक्तव्य केले होते. शिक्षण हे महत्वाचे आहे, असेही तो म्हणाला होता. याबरोबरच, त्याने असाही खुलासा केला होता की पत्नी ट्विंकल खन्नाची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण, आजपर्यंत त्याने एकही पुस्तक वाचले नाही.

कामाच्या बाबतीत बोलायचे तर अभिनेत्याचा भूत बंगला हा सिनेमा १६ एप्रिल २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियदर्शन व तब्बू जवळजवळ २५ वर्षानंतर एकत्र काम करत आहेत. २५ वर्षांत एकत्र काम का केले नाहीत, असे विचारले असता, तशा चित्रपटासाठी विचारणा झाली नाही, असे कलाकारांनी सांगितले. तसेच, प्रियदर्शन व अक्षय कुमारदेखील १६ वर्षानंतर एकत्र काम करत आहेत.