बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलीवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. आज अक्षय कुमार त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयने आज त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे.
अक्षयने त्याच्या बहुचर्चित ‘वेलकम ३’ चित्रपटाचं म्हणजेच ‘वेलकम टू जंगल’ या तिसऱ्या भागाची घोषणा करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ अत्यंत मजेशीर आहे अन् सोशल मीडियावर तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘वेलकम टू जंगल’मधील संपूर्ण स्टारकास्टशी ओळख करून दिली आहे.
आणखी वाचा : वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार झाला बाबा महाकालसमोर नतमस्तक; आगामी चित्रपटाच्या यशासाठी केली प्रार्थना
या चित्रपटात बडेबडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील कलाकार आर्मीच्या वेशात एकत्र ‘वेलकम’चं टायटल सॉन्ग सादर करताना दिसत आहे. हे गाणं सादर करायची त्यांची पद्धत फारच वेगळी आणि मजेशीर आहे. ‘वेलकम’ सीरिजमधील नाना पाटेकर अन् अनिल कपूर यांची जागा अर्शद वारसी व संजय दत्त यांनी घेतल्याचं समोर आलंच होतं. याबरोबर इतरही कलाकार या व्हिडीओमधून समोर आले आहेत.
या चित्रपटात अक्षय कुमारबरोबरच परेश रावल, राजपाल यादव, सुनील शेट्टी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, दलेर महेंदी, शरीब हाश्मी, झाकीर हुसेन, जॉनी लिवर, अर्शद वारसी, संजय दत्त, जॅकलिन फर्नांडिज, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता अशी भलीमोठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट पुढीलवर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अन् यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.