ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यापूर्वी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी रिलेशनशिपमध्ये होते. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. नुकतच दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी १९९९ मध्ये अक्षय आणि शिल्पाची जोडी असलेल्या ‘जानवर’ या हिट चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानचा किस्सा सांगितला. त्यावेळी दोघे लग्न करण्याच्या अगदी जवळ आले होते, असा खुलासा त्यांनी केला.
मिनिट्स ऑफ मसालाला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन यांनी १९९०च्या दशकाच्या अखेरीस सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमारच्या करिअरमध्ये आलेल्या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. या काळात अक्षयच्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अशा परिस्थितीत सुनील दर्शन यांच्या ‘जानवर’ या चित्रपटाने अक्षयच्या करिअरला पुन्हा उभारी दिली आणि तो त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. ते म्हणाले, “एका टप्प्यानंतर निर्मात्यांनी अक्षयबरोबर चित्रपट बनवणं बंद केलं होतं, कारण त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसादच मिळत नव्हता.”
काही गैरसमज झाल्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं – सुनील दर्शन
दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन यांनी सांगितलं की, त्या काळात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीमध्ये चांगले संबंध होते. दोघे लवकरच लग्न करतील, असंही त्यांना वाटत होतं. मात्र, काही गैरसमजांमुळे दोघांचं नातं तुटलं, असा खुलासा त्यांनी केला. ते म्हणाले, “त्या काळात अक्षय आणि शिल्पाचं नातं खूप चांगल्या वळणावर होतं. मला वाटत होतं की दोघे जवळपास लग्न करणार आहेत. मात्र, काही गैरसमज झाले आणि त्यांचं ब्रेकअप झालं.”
‘जानवर’ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि त्यामुळे अक्षय कुमारचा कठीण काळही संपला. यामध्ये ‘सपूत’ (१९९६), ‘लहू के दो रंग’ (१९९७), ‘इन्साफ: द फायनल जस्टिस’ (१९९७), ‘दावा’ (१९९७), ‘तराजू’ (१९९७) यांसह अनेक चित्रपटांचा समावेश होता. सुनील दर्शन म्हणाले, “जानवर प्रदर्शित झाला आणि हिट ठरला. अक्षय कुमारच्या स्टारडममध्ये या चित्रपटाचा मोठा वाटा आहे”.
सुनील दर्शन यांनी पुढे सांगितलं, ‘हेरा फेरी’, ‘धडकन’ यांसह अक्षयचे जे चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत होते, त्या सर्व चित्रपटांच्या निर्मात्यांनी ते प्रदर्शित करण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर तब्बल २५ वर्षे त्याच्या करिअरची घोडदौड सुरू राहिली आणि त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मी त्याच्याबरोबर एकूण ७ चित्रपट केले.”
मात्र, एकदा जेव्हा सुनील दर्शन हृतिक रोशनबरोबर पुढचा चित्रपट करणार असल्याची अफवा अक्षय कुमारच्या कानावर आली आणि तो काहीसा गोंधळला. याबद्दल सुनील दर्शन म्हणाले, “जानवर प्रदर्शित झाल्यानंतर एकदा अक्षयने इंडस्ट्रीत अशी चर्चा ऐकली की, मी माझ्या पुढच्या चित्रपटासाठी हृतिक रोशनला साइन करत आहे. तो माझ्याकडे आला आणि त्याने विचारलं की, मी तुमच्याशी काही चुकीचं वागलो आहे का? त्यावर मी त्याला स्पष्ट केलं की, मी हृतिकच्या घरी गेलो होतो, पण मी त्याला साइन केलेलं नाही. हा केवळ गैरसमज होता.” सुनील दर्शन यांनी पुढे सांगितलं, “यानंतर त्याने माझ्याकडून त्याच्याबरोबर १०० चित्रपट करण्याचं वचन घेतलं. मी त्याला म्हटलं,खूप छान.”
सुनील दर्शन आणि अक्षय कुमार यांनी ‘अंदाज’, ‘तलाश: द हंट बिगिन्स’, ‘एक रिश्ता: द बॉन्ड ऑफ लव्ह’ यांसह इतरही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
