Akshay Kumar Twinkle Khanna Wedding Secrets: बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचं लग्न हे बॉलीवूडमधील चर्चेत राहिलेल्या लग्नांपैकी एक आहे. यावर्षी दोघांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. अक्षय व ट्विंकलच्या लग्नाची एक खास आठवण दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितली आहे. लग्नाच्या दिवशीही अक्षय कुमार हा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सीन शूट करत असल्याचा मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला आहे.
‘मिनिट्स ऑफ मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन यांनी अक्षय कुमारच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. अक्षय कुमार हा त्याच्या लग्नाच्या वेळी सुनील दर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एक रिश्ता : द बॉन्ड ऑफ लव्ह’ या सिनेमात काम करत होता. विशेष म्हणजे, लग्नाच्या दिवशीही अक्षयने सीन शूट केला. सुनील दर्शन म्हणाले, “अक्षय कुमार हा त्याच्या लग्नावेळी अमिताभ बच्चन आणि राखी गुलजार यांच्याबरोबर शूटिंग करत होता. लग्नाच्या दिवशीही त्यानं शूट केलं होतं.”
अक्षयने लग्नाच्या दिवशीही केलेलं शूटिंग
सुनील दर्शन पुढे म्हणाले, “अक्षय कुमारला त्याच्या लग्नाबद्दल जास्त लोकांना सांगायचं नव्हतं, म्हणून तो लग्नाच्या दिवशीही शूटिंग करत होता. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्याने शूट केलं. यानंतर त्याने मेकअप आर्टिस्टची बाईक घेतली, हेल्मेट घातलं आणि घरी गेला. हेल्मेट घातल्यामुळे त्याला कोणीही ओळखू शकलं नाही. कोणताही लग्नाचा गाजावाजा न करता त्यानं लग्नाच्या दिवशीही शूटिंग केलं आणि घरी गेला होता.”
अक्षय कुमारने त्याचं लग्न असल्याचंही अगदी मोजक्या लोकांना सांगितलं होतं. ते म्हणाले, “अक्षयच्या लग्नामध्ये फक्त मी आणि आणखी काही मोजकेच लोक होते. हा खासगी सोहळा होता आणि त्यांना त्याचा गाजावाजा करायचा नव्हता.”
सुनील दर्शन आणि अक्षय कुमार यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘जानवर’, ‘एक रिश्ता’, ‘हां मैंने भी प्यार किया’, ‘तलाश : द हंट बिगिन्स…’ आणि ‘अंदाज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. मात्र, त्यानंतर दोघं एकमेकांशी २० वर्षांहून अधिक काळ बोलत नव्हते.
अक्षय कुमार व ट्विंकल खन्नाची लव्ह स्टोरी
दरम्यान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची पहिली भेट एका मित्राच्या पार्टीत झाली होती. त्यानंतर ‘इंटरनॅशनल खिलाड़ी’च्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अक्षय आणि ट्विंकल यांनी १७ जानेवारी २००१ रोजी लग्न केलं. या दोघांचं लग्न अगदी खाजगी पद्धतीनं झालं होतं. आता त्यांना आरव आणि नितारा अशी दोन अपत्य आहेत.
